पुणे
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्याही अडचणीत आता वाढ झाली आहे. खेडकर यांच्या संपत्तीची पुणे लाचलुचपत विभागने (ACB) प्राथमिक चौकशीत केली असता, त्यांनी महाराष्ट्र सरकारमधील आपल्या सेवेदरम्यान बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचं उघड झालं. त्यामुळं आता त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल होऊ शकतो. अशी माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
दिलीप खेडकर हे 2020 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. पूजा खेडकर यांचे नवनवीन कारनामे समोर येत असतांनाच दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली होती. एसीबीच्या पुणे युनिटने गुरुवारी सायंकाळी एजन्सीच्या राज्य मुख्यालयात प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. खेडकर यांची कौटुंबिक संपत्ती 40 कोटींच्या वर असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. अशी माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
खेडकर यांच्याकडे मुंबई, पुणे, पुणे ग्रामीण आणि अहमदनगर येथे अनेक मालमत्ता आहेत. त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केले की त्यांच्याकडे सुमारे चाळीस कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
पाथर्डीसह मुंबईतील दोन ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. मनोरमा खेडकर यांचा अद्यापही पत्ता लागलेला नसल्याचं पुणे ग्रामीण पोलिसांनी ही माहिती दिलीय. पौड पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने पूजा खेडकरचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला आहे. तसेच पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी त्यांना माघारी बोलावण्यात आले, असे महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी पत्रात नमूद केले आहे.