8 C
New York

Junnar : जुन्नर तालुक्यात पावसाने पाठ फिरवली; ओढे ,नदी,नाले कोरडे

Published:

रमेश तांबे, ओतूर

पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरी अद्याप जुन्नर (Junnar) तालुक्यामध्ये मुसळधार धो -धो पाऊस न पडल्याने येथील शेतकऱ्यांवर पावसाचे संकट ओढवले आहे. पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली असून, बळीराजा आभाळाकडे डोळे वर करून पाहत आहे. जून महिना संपून जुलै महिना निम्मा संपला तरी अद्याप ओढे, नदी,नाले कोरडे असून आदिवासींच्या भात शेतीसह यावर्षीचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील ज्या-ज्या भागात थोड्याफार  रिमझिम पावसाचे आगमण झाले, तशी, तशी शेतकऱ्यांनी खरिपातील पेरण्यांची कामे आटपून घेतली आहेत, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी अद्याप पेरण्या देखील केलेल्या नाहीत अशी देखील परिस्थिती पहावयास मिळत आहे.

शेतकऱ्यांनी महागडे बी- बियाणे खरेदी करून खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत.काही ठिकाणी पिकांची उगवण देखील चांगली झालेली आहे,मात्र पेरणी करून देखील दमदार पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. तालुक्यात काही दिवसांपासून पावसाने हूलकावणी दिल्यामुळे सध्या खरिपाच्या पिकांसाठी दमदार पावसाची आवश्‍यकता आहे.सुरवातीला झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरिप हंगामातील  पिकांची पेरणी केली; परंतु त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने या पिकांना आता धोका निर्माण झाला आहे.शेतकरी जूनच्या पूर्वीच शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतात, या वर्षी जून महिन्याच्या अखेरपर्यंत तालुक्यात खरीप हंगामातील पेरण्या पावसाअभावी लांबणीवर पडल्या होत्या.काही ठिकाणी पेरणी योग्य झालेल्या एखाद्या दुसऱ्या  पावसावर शेतकऱ्यांनी यंदा भुईमूग,सोयाबीन,तूर, मूग, उडीद,ज्वारी, बाजरी आदी खरीप पिकांची पेरणी केली, मात्र पाऊस वेळेवर न पडल्यामुळे यावर्षी सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील लांबणीवर पडल्या. जुन्नर तालुक्यातील ओतूर,ओझर,हिवरे, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, अहिनवेवाडी, नेतवड, माळवाडी, बल्लाळवाडी, डिंगोरे, उदापूर, धोलवड, ठिकेकरवाडी, उंब्रज, डुंबरवाडी, खामुंडी, गायमुखवाडी या गावांमध्ये मागील दोन-तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस पडला नाही.

जून महिना यावर्षी संपुर्ण कोरडाच गेल्यामुळे शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पहात होते. त्यानंतर जूलै महिन्यात थोड्याशा पडलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी झाली, त्या ठिकाणी पिकांची उगवण झाली तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली असून या पिकांना आता दमदार पावसाची अत्यंत गरज आहे.तालुक्यातील आळे,आणे, राजुरी, बेल्हे, साकुरी नारायणगाव, हिवरे, मांजरवाडी, बोरी, शिरोली,ओतूर, पिंपरी पेंढार, उदापूर, डिंगोरे, रोहोकडी, उंब्रज, अहिनवेवाडी, आंबेगव्हाण, पाचघर, चिल्हेवाडी, ठिकेकरवाडी, धोलवड, हिवरे बुद्रुक, नेतवड, माळवाडी, आलमे या भागांतील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची कामे पूर्ण केली आहेत, मात्र पेरणी करून उगवून आलेल्या पिकांसाठी दमदार पावसाची गरज आहे. तूर ,मूग, मठ, बाजरी, भुईमूग, घेवडा व इतर कडधान्यांच्या खरिपाच्या पिकांसाठी बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील मढ, सितेवाडी, तळेरान, निमगीरी, तळमाची, खिरश्वर, खैरे, खटकाळे, खुबी, करंजाळे, तळमाची, देवळा, अंजनावळे, सोनावळे, भिवाडे, कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभूळशी परिसरातील शेतकऱ्यांनी दहा दिवसापूर्वी भाताची लागवड केली आहे. तर काही भागात भाताची लागवड अद्यापही सुरू आहे. मात्र गेल्या पंचवीस ते तीस वर्षानंतर पहिल्यांदाच यावर्षी आदिवासी भागात,डोंगर माथ्यावर पाऊस अत्यल्प पडला असल्याची खंत आदिवासी शेतकऱ्यांनी व्यक्त करून यावर्षीची आदिवासींची भातशेती धोक्यात येते की काय ? अशी भीती आदिवासी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसापासून या भागात ऊन पडत आहे. पावसाने दडी मारल्याने संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img