रमेश औताडे, मुंबई
मुंबईकरांना (Mumbai) कचरामुक्त शहर देणारे आम्ही सफाई कंत्राटी कर्मचारी (Contract cleaners) न्यायालयाच्या आदेशानंतरही पालिका (BMC) कायम होत नाही. आम्ही मेल्यावर पालिका आम्हाला कायम करणार का ? असा सवाल करत कंत्राटी सफाई कामगारांनी अधिवेशन संपल्यानंतर आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे.
स्वच्छ भारत अभियानासाठी हातात झाडू घेऊन फोटो काढणारे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी मोठी जाहिरात केली. देशभरातील एकाही सफाई कामगार अन्याय सहन करणार नाही असे आश्वासन त्यांनी सफाई कामगारांच्या जाहीर कार्यक्रमात दिले होते. मात्र आमच्या हातातील झाडू व आमच्या माथी मारलेला कंत्राटी कामगारांचा ठप्पा न्यायालयाच्या आदेशानंतर आजही दूर केला नाही. अशी खंत व्यक्त सरकारच्या नावाने तीव्र संताप व्यक्त करत भर पावसात हे सफाई कामगार आंदोलन करत आहेत.
हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांच्या बाजूने दिलेला निकाल अद्याप अनेक पालिका अंमलबजावणी करत नाहीत. मुंबईतील ५८० कंत्राटी कामगार अजून कायम सेवेत का वर्ग होत नाहीत ? असा सवाल कामगार न्यायालय पालिकेला विचारत आहे. २५ वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करणारे काही कामगार मृत पावले आहेत. काही वयोवृध्द झाले आहेत. हे कामगार कायम होतील तेव्हा रिटायर्ड होतील. मग अशा वृध्द कामगारांना कायम करून पालिका स्वतःचे हसू करून घेणार आहे का ? असा सवाल कचरा वाहतूक श्रमिक संघाचे चिटणीस विजय दळवी यांनी यावेळी केला.