मुंबई
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत दु:ख जाणार नाही, अशी प्रतिक्रिया ज्योतीर्मठाचे शंकराचार्य (Shankaracharya) अविमुक्तेश्वरानंद (Jyotirmatha shankaracharya Avimukteshwaranand) यांनी मातोश्रीवर (Matoshree) उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर दिली.कोणाचं हिंदुत्व खरं हे समजून घ्यावे लागेल पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो, असेही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेवर बहिष्कार घालणारे ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी कुटुंबीयांसह पादुका पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. उद्धव ठाकरे यांनी अविमुक्तेश्वरानंद यांनी राम मंदिराच्या मुद्यावर घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले होते हे विशेष.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत धोका करून त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं. महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासात झालाय. जनता उद्धव ठाकरे यांच्यामागे आहे. आपण सगळे हिंदू आणि सनातन धर्माचा पालन करणारे लोक आहोत. पुण्य पापाची भावना आपल्याकडे सांगितली आहे. सगळ्यात मोठा घात हा विश्वासघात असतो. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झालेला आहे. याबाबतची पीडा अनेकांना असल्याचं शंकराचार्य म्हणाले.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, कोणाचं हिंदुत्व खरं हे समजून घ्यावे लागेल. पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असतो. जनतेचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे, जनमताचा अनादर करणे हे चुकीच आहे. मोदी माझ्यासमोर आले त्यांनी मला प्रणाम केला आणि आमचा नियम आहे. जो कोणी प्रणाम करायला येतो त्याला आम्ही आशीर्वाद देतो. नरेंद्र मोदी माझे शत्रू नाहीत त्यांच्या हिताबद्दलच मी बोलत असतो. त्यांच्या चांगल्यासाठीच आम्ही बोलत असतो. चूक झाली तर आम्ही त्यांना थेट चूक झाली म्हणून सांगतो, असंही स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य म्हणाले.