मुंबई
मोदींकडे (PM Narendra Modi) परदेशात (USA) झालेल्या गोळीबारावर कमेंट करण्यासाठी वेळ आहे. पण मणिपूरमधील (Manipur) आदिवासींच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
भारतापेक्षा अमेरिका त्यांना जास्त प्रिय आहे का? ते मणिपूरला भारताचा भाग मानत नाहीत का? भारतातील आदिवासींवर त्यांचे प्रेम नाही का? असे सवालही ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केले आहेत.
रविवारी दि.14 अमेरिकेतील बटलर, पेनसिलव्हेनिया येथे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार झाला होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आणि या घटनेचा निषेध केला होता. मात्र, मणिपूर येथील घटनेवर मोदींनी मौन बाळगले आहे. किंबहुना अजूनही ते मणिपूर येथील आदिवासी बांधवांच्या हत्याकांडाविषयी बोलायला किंवा मणिपूर येथे पीडितांची भेट घ्यायला तयार नाहीत. याच पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.