3 C
New York

Maharashtra Government : पायी वारी करणाऱ्यांना मिळणार पेन्शन, राज्य सरकारचा निर्णय

Published:

विठुरायाच्या नामाचा गजर करत राज्यभरातील लाखो पावलं पंढरीच्या (Pandharpur News) दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता फक्त आणि फक्त आपल्या माऊलीच्या भेटीच्या ओढीनं ही पावलं मैलोन् मैलचं अंतर पार करत पंढरीकडे चालत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) अनेक पालख्या पंढरीच्या वाटेवर आहेत. आता याच माऊलीच्या भक्तीनं न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारकडून (Maharashtra Government) दिलासा देण्यात आला आहे. राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारनं मदतीचा हात देऊ केला आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळच्या (Mukhyamantri Varkari Sampradaya Mahamandal) वतीनं शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. तसेच, महामंडळाचं भाग भांडवल 50 कोटी इतक असणार आहे. तसेच, कीर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिलं जाणार आहे.

दरवर्षी महाराष्ट्रातील गावागावातून भाविक वारकरी वारीला जातात. या वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी, शेतकरी यांचा समावेश असतो. मात्र दिवसेंदिवस दिंड्यांची संख्या वाढतच चालली असून या पार्श्वभूमीवर वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. यासाठी 11 जुलै 2024 रोजी झालेला बैठकीत “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार, वारकऱ्यांना अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमाकवच, पायाभूत सुविधा इत्यादी सोयी-सुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” कार्य करणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे, सर्व पालखी सोहळा मार्गाची सुधारणा करणे, वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करिता अनुदान देणे या गोष्टींचा समावेश आहे.

वयोवृद्धांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा

महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये वारकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केलं जाणार आहे. तसेच, वारकऱ्यांना पेन्शन लागू केलं जाणार आहे. या महामंडळाच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासाला देखील गती येईल. अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे हे महामंडळ निर्माण करण्यात आलं आहे. या महामंडळांबाबत नुकतंच वारकरी संप्रदायाच्या वतीनं राणा महाराज वासकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून वारकरी महामंडळाच्या आदेशाची प्रत वारकऱ्यांना देण्यात आली आहे.

Maharashtra Government मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या महत्त्वाच्या योजना कोणत्या?

सर्व पालखी मार्गांची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा आणि सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन.
आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच.
वारकरी भजनी मंडळाला भजन आणि कीर्तन साहित्यासाठी (टाळ, मृदंग, वीणा आदी) अनुदान.
कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना.
पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) व इतर तीर्थक्षेत्रांचा विकास.
चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img