मुंबई
राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज सकाळीच वरिष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. काल त्यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. या टीकेनंतर त्यांनी आज कोणतीही पूर्वसूचना न देता भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, यासंदर्भात आज छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही राजकीय भेट नसून राज्यातील स्फोटक परिस्थितीत शरद पवारांनी लक्ष घालावं याकरता ही भेट घेतली असल्याचं छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले की, मी शरद पवारांच्या भेटीला गेलो तेव्हा पवार साहेब झोपलेले होते. त्यांची तब्येत बरी नसल्याने ते आराम करत होते. त्यानंतर एकदीड तासाने आमची भेट झाली. त्यामध्ये आम्ही एक ते दीड तास चर्चा केली. दरम्यान, मी पवार साहेबांना सांगितलं मी मंत्री म्हणून, राजकारणी म्हणून किंवा राजकीय मुद्दा घेऊन आलो नाही. तुम्ही ओबीसींना आरक्ष दिलं. परंतु, आज महाराष्ट्रात जी काही परिस्थिती निर्माण झाली ती कठीण आहे. कुणी कुणाच्या दुकानात जात नाही अशी परिस्थिती आहे. त्यावर आपण राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून यावर तोडगा काढला पाहिजे अशी विनंती आपण शरद पवारांना केली अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मी यावेळी मराठवाडा विद्यापिठाच्या नामांतराची आठवण करून दिली. सर्वत्र विरोध होत असताना शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी नामांतराचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही मंत्री झालो, उपमुख्यमंत्री झालो तरी आम्हाला राज्यातील सर्वच माहिती आहे असं नाही. त्यामुळे शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राज्यातील परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे पवारांनी या परिस्थितीमध्ये लक्ष घालाव आणि त्यावर तोडगा काढावा अशी विनंती आपण पवारांना केली असल्याचं भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.
छगन भुजबळ म्हणाले की, मी आमदारकी, मंत्रीपद यासाठी बोलत नाही. त्याची मला काळजी नाही. मी आज राज्यात जी परिस्थिती आहे. त्यावर बोलायला गेलो होतो. आज राज्यात जाती-जातीमध्ये जे वातावरण पेटलं आहे ते शांत व्हाव ही माझी इच्छा आहे. त्यामुळे ही भेट होती. यामध्ये कोणतंच राजकारण नव्हत. त्यामुळे याचा काही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. तसंच, फक्त पवार साहेबच नाही तर या मुद्यासाठी मला लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची गरज पडली तरी मी त्यांनी भेट घेणार असंही यावेळी भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले की, मी सभागृहात मी जे काही बोललो तेच बाहेरही बोलतो. मला मंत्रिपद कशाची परवा नाही. दरम्यान, मी पवारांच्या भेटीला जाताना प्रफुल पटेल यांच्यासोबत बोलणं झालं होतं. त्यांना याबाबत माहिती दिली होती. दरम्यान, राज्यातील अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, विजय वड्डेटीवार, उद्धव ठाकरे अश्या सगळ्यांना बोलवून ही बैठक होऊ शकते. यावर पवार साहेबांनी मी एक ते दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलणार आहे अस आपल्याला सांगितलं असल्याचं छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितंल आहे. तसंच, आपल्याकडं जे काही कागदपत्र आहेत ते सर्व आपण पवार साहेबांना दाखवले आहेत असंही ते म्हणाले आहेत.