रमेश औताडे, मुंबई
सरकार, महानगरपालिका व बेस्ट (Best) प्रशासन यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही तर 75 वर्षापासूनची बेस्ट परिवहन सेवा ठप्प होईल अशी माहिती कामगार नेते शशांक राव (Shashank Rao) यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
२०१९ पासून बेस्टने बस गाड्या खरेदी करणे बंद केले असल्याने आज बेस्टच्या मालकीच्या १०८५ बसेस आहेत. मुंबईकरांच्या सेवेसाठी ३३३७ बसेसची गरज आहे. बसेस चे आयुष्मान कायदा पाहता प्रत्येक महिन्याला बसेस स्क्रॅप कराव्या लागतात. त्यामुळे ३१ नोव्हेंबर पर्यंत बेस्ट कडे २५१ बसेस शिल्लक राहतील. या २५१ बसेस वर मुंबईकरांना सेवा देण्यासाठी बेस्टला या सेवेपासून राम राम घ्यावा लागेल व पर्यायाने मुंबईकरांना हि सार्वजनिक परिवहन सेवा मिळणार नाही अशी माहिती राव यांनी यावेळी दिली.
यावर उपाय म्हणून बेस्ट ने बस खरेदी न करता बस कंत्राटदार नेमून ही सेवा देण्यासाठी पावले उचलली आहेत. मात्र एका कंत्राटदाराने काही महिन्यांपूर्वी नफा होत नसल्याने एका रात्रीत सेवा बंद केली होती. असा अनुभव असताना बेस्ट व पालिका अजून किती दिवस कंत्राटदाराच्या भरवश्यावर राहणार आहे. पालिका म्हणते सरकारने जर आम्हाला अर्थ सहाय्य केले तर आम्ही बेस्टला बस खरेदी करण्यास पैसे देऊ. असे धोरण जर पालिकेचे असेल तर ४५ हजार कोटींचे बजेट पालिका काय करते ? असा सवाल राव यांनी यावेळी केला.
आयुष्यमान संपलेल्या बसगाड्यांच्या बदल्यात नवीन बसगाड्या विकत घेण्यासाठी आवश्यक निधी महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमाला द्यायचा आहे असा ठराव आहे. प्रवाशांना सेवा देताना नफा तोटा पाहायचा नसतो असा जगभरातील परिवहन सेवेचा कायदा असताना २०१९ नंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बेस्ट उपक्रमाला आयुष्यमान संपलेल्या बसगाडांच्या बदल्यात नवीन बसगाड्या विकत घेण्यासाठी कुठलाही निधी देण्यात आलेला नाही. यासाठी मुंबईतल्या प्रवासी संघटना, मुंबईकर नागरीकांसाठी काम करणाऱ्या एन.जी.ओ., सामाजिक कार्यकर्ते, हाऊसिंग असोसिएशन्स इतर संघटनांच्या मदतीने १८ जुलै पासून मुंबईकर जनतेपर्यंत ” बेस्ट बचाव अभियान” पोहचणार असल्याचे राव यांनी सांगितले.