मुंबई
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामानाच्या रोखठोक सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर घणाघाती टीका केली होती. यालाच आता भाजप नेते आमदार ॲड आशिष शेलार प्रत्युत्तर (Ashish Shelar Letter) दिलं आहे. त्यांनी X वर राऊतांना खुलं पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी संजय राऊत यांचा उल्लेख श्रीमान मोरारजी राऊत असा केला आहे. आमदार आशिष शेलारांचं संजय राऊतांना रोखठोक प्रत्युत्तर
आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रात एखादा उद्योग व्यवसाय येणार किंवा नवीन विकास प्रकल्प होणार, असे कळताच कट कमिशन आणि राजकीय स्वार्थासाठी हातात विरोधाचा झेंडा घेऊन जे उतारतात, उद्योगांना महाराष्ट्रातून पळवून लावतात, त्याच पक्षाचे नेते संजय राऊत महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून अग्रलेख लिहितात?
आशिष शेलार म्हणाले की, आता विषय काढलाच आहे तर मग, संजय राऊत तुम्हाला उत्तर द्यावी लागतील… मुंबई सोडून एलएनटी का गेली? कुणाची युनियन होती? महेंद्रा कंपनी मुंबई सोडून अन्य राज्यात का गेली? कुणाची युनियन होती? खंबाटा, एएफएल लॉजिस्टीक यांनी का शटर डाऊन केली? या सगळयांना युनियन बनवून कुणी त्रास दिला? ही मुंबईतील काही मोजकी उदाहरणे महाराष्ट्रातील गेल्या १५ वर्षातील उद्योग बंद झाले त्याचा हिशेब काढला तर मग पुण्याच्या बजाज पासून सगळया कारखान्यांमध्ये उबाठाचीच युनियन होती ना?. वेदांत फॉस्कॉन, बारसूची ग्रीन रिफायनरी, वाढवण बंदर या प्रकल्पांना विरोध कोण करतेय ? आणि पुन्हा महाराष्ट्रातून प्रकल्प गेले म्हणून ओडताय? चोर तर चोर वरुन शिरजोर? मराठी कामगारांना उध्दस्त करणाऱ्या उबाठाचे हात मराठी माणसाच्या रक्ताने ही माखलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात मराठी माणासावर गोळया झाडणाऱ्या स.का.पाटील, मोरारजी देसाई यांच्या काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही बागडत आहात ना? काँग्रसशी हात मिळवणी केलीत, तुमच्या हाताला मराठी माणसाचे रक्त लागलेले आहे. तुम्हाला इतिहास कधीच माफ करणार नाही. श्रीमान संजय राऊत तुमचे कसे झालेय सांगू का?” ‘म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहेत’, असं त्यांनी पत्राच्या शेवटी लिहिलं आहे.