मुंबई
मुंबईत पावसाचा (Mumbai Rain) जोर वाढलाय. मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस, तर अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची नोंद झाल्याचं समोर आलंय. मुंबई उपनगरात सकाळी पाच वाजेपर्यंत131.2 मिलिमीटर पावसाची नोंद, तर मुंबई शहरात 77.4 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. मुंबईतही आजही राहणार पावसाचा जोर कायम राहणार आहे. पश्चिम रेल्वेची (Western Railway) वाहतूक विस्कळीत झालीय.
प्रभादेवी आणि दादर दरम्यान झाड कोसळल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावर पिंपळाचं झाड कोसळलं होतं. ही घटना सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती. ऐन रेल्वे रुळावर झाड कोसळल्याने धिम्या मार्गावरील लोकलला जवळपास तासभर खोळंबा झाला होता. जवळपास तासाभराच्या रखडपट्टीनंतर बोरिवलीच्या दिशेने धिम्या मार्गावरील गाड्या सुरू झाल्यात.
मुंबईतही आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मुंबईत येलो अलर्ट देण्यात आलाय. पुढील 48 तास मुंबईत चांगला पाऊस अपेक्षित आहे. कोकणात आज काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.रायगडमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.