छत्रपती संभाजीनगर
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली 13 जुलैपर्यंतची वेळ संपलेली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Reservation) देण्यासाठी चौथ्यांदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला महिन्याभराचा अवधी दिला होता. परंतु, त्यांचा हा अवधी आता संपुष्टात आला आहे. ज्यामुळे आता पुन्हा एकदा जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत. येत्या 20 जुलैपासून ते अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार असून, त्याच दिवशी राज्यातील 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे हे ठरविण्यात येणार आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षाचे दोन-तीन पालकमंत्री मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत. दिलेल्या मुदतीत आरक्षण न मिळाल्यास त्याचा दोष सरकारला देऊन उपयोग नाही. सरकारवरचा आमचा विश्वास उडाला आहे, असे कधीही म्हटले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून इतर मंत्र्यांवर दबाव आणत असतील, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील. कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचे आहेत. 13 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिले नाही, ते आता कसे मिळवायचे ते आम्ही पाहतो, असा इशाराच मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आला आहे. मराठ्यांच्या चुका काढायच्या आणि स्वतःच्या जातीचा उदोउदो करायचा, हे चुकीचे आहे. समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. 20 तारखेपासूनचे आमरण उपोषण कठोर असणार आहे. गेले 10 ते 11 महिने आम्ही संयमाने घेत आहोत. पण त्याचे परिणाम दिसत आहेत. मी उपोषण करावे, अशी समाजाची इच्छा नाही, पण मी त्यांचे मन बदलेन. समाजासाठी बलिदान देण्यास तयार आहे. समाज मोठा झाला पाहिजे. समाज सुखी झाला पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.