बारामती
सरकारने सुरू केलेल्या योजना कायमस्वरुपी चालू ठेवायचं असले तर,विधानसभेला महायुतीला निवडून द्या. घोषणांचा जोर विधानसभापर्यंत असाच ठेवा. हवसे,नवसे,गावसे येतील, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका,असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामतीत विरोधकांवर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीत जन सन्मान मेळावा झाला. या सभेवेळी पावसाने हजेरी लावली, तरीही कार्यकर्त्यांनी आपली जागा न सोडता अजित पवारांचं भाषण डोक्यावर खुर्च्या घेऊन ऐकलं. अजित पवारांनी सरकारने सुरू केलेल्या योजनांचा पाढा वाचला. त्याबरोबर त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला. राज्यात सुरू करण्यात आलेल्या योजनांवर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.
वरुणराजाने वर्षाव करुन आपल्याला एकप्रकारे पाठिंबाच दिला आहे. लोकसभा निवडणूकीनंतर पहिल्यांदाच तुमच्यासमोर आज ‘जन सन्मान’ रॅलीच्या माध्यमातून उभा आहे. जनतेचा विकास आणि गरीब लोकांना मदत करण्याच्या हेतूने आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि हाच विचार आम्ही विधानसभा निवडणुकीत राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सर्व जनतेला सांगणार आहे अशी स्पष्ट भूमिका अजितदादा पवार यांनी बारामती येथील जन सन्मान रॅलीच्या जाहीर सभेत मांडली.
लोकसभेत आपल्याला अपयश आले परंतु त्याने खचून जायचे नाही आणि कालच्या विधानपरिषद निवडणूकीत यश आले म्हणून हुरळून जायचे नाही. यश पण पचवायला शिकले पाहिजे आणि नव्या उमेदीने लोकांसमोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि तीच तयारी माझ्या सहकार्यांनी ठेवली आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
कालच्या निवडणुकीत शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना दिलेला शब्द मी खरा करुन दाखवला आहे. मी शब्दाचा पक्का आहे. जो वादा असतो तो पक्का असतो. हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ज्यावेळी मला अर्थखाते मिळाले त्यावेळी मी जनतेचा विकास करताना गरीबी दूर करायची आहे असा निर्णय घेतला होता आणि त्यापध्दतीने पावले उचलली असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
महिलांकरीता ‘लाडकी बहिण योजना’ आणली त्यावेळी माझ्यावर टिका झाली मात्र मी त्यांना फार महत्व दिले नाही. माझ्या पाठीशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्व लोकांचे सहकार्य आहे याची खात्री होती. त्यामुळे ही योजना चांगल्या पध्दतीने राबवू शकतो हा विश्वास मला आहे असेही अजित पवार म्हणाले.
चांद्यापासून बांद्यापर्यत माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार आहेत. तीन सिलेंडर मोफत देणार आहे. माझी महिला सक्षम व्हावी… आत्मनिर्भर व्हावी यासाठी ही योजना महायुतीने आणली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून द्यायचे आहे. निवडून नाही दिले तर ही योजना मला नीट राबवता येणार नाही असे सांगतानाच आता हौसे – नौसे – गौसे आमची योजना कशी चुकीची आहे हे सांगायला येतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.
माझ्या शेतकऱ्यांना वीज मोफत देत आहे. शेतकऱ्यांनो आता चांगले धान्य पिकवा. एक रुपयात पीकविमाही देत आहोत. एकरी पाच हजार रुपये कापूस आणि सोयाबीनला दिले आहेत. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा काळजी करू नका असा शब्दही अजित पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
विकास आणि गरीबीचा विचार करताना दूध उत्पादक शेतकऱ्यांचाही विचार केला त्यांना वाढीव पाच रुपये अनुदान दिले आहे. भावंडांसाठी मदत करत आहे. हा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांवर आम्ही अठरापगड जातींना घेऊन पुढे जात आहोत हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.
लोकसभेला वेगळे वातावरण निर्माण झाले. आम्ही विकासावर बोलत होतो त्या सर्वांना बाजूला ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली ती घटना बदलतील असा खोटा प्रचार केला गेला. तुमच्या – माझ्या महाराष्ट्रात काम करत असताना महिला, पुरुष, वृध्द, तरुण, मुलींवर अन्याय होणार नाही असा शब्दही अजित पवार यांनी यांनी यावेळी दिला.
सत्ता येते जाते… कोण ताम्रपट घेऊन आलेला नाही. आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही मात्र त्या सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसांसाठी करण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून मागे खेचायचे आहे. तुम्ही घाबरु नका राज्य आणि केंद्रसरकार तुमच्या पाठीशी आहे असा विश्वासही अजित पवार यांनी दिला.
सत्ता ही पदे उपभोगण्यासाठी नसते म्हणून सर्व समाजघटकांतील मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ७५ हजार कोटी रुपये राज्यातील विविध घटकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. विकास हा राष्ट्रवादी काँग्रेसने डोळ्यासमोर ठेवला आहे त्यातून गरीबी दूर केली जाणार आहे असेही अजित पवार म्हणाले.
विधानसभा मतदान होईपर्यंत ही जन सन्मान रॅली थांबणार नाही. संपूर्ण राज्य ढवळून काढणार आहे असे आवाहनही अजित पवार यांनी केले. कोण भावनिक करत असेल तर भावनिक होऊ नका त्यातून विकास होत नाही. बारामती बघत बघत मला महाराष्ट्र फिरायचे आहे त्यामुळे हे काम माझ्या घरचे नसून सर्वांचे आहे असे समजून इथल्या माझ्या लोकांनी जबाबदारी पार पाडायची आहे असेही अजित पवार यांनी सांगितले. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत राज्यघटनेला कोण धक्का लावणार नाही. आता कोण असे गैरसमज निर्माण करत असेल तर त्याला ठासून सांगा आमचा अजितदादांवर विश्वास आहे ही आपली भूमिका सर्वांना सांगा असेही अजित पवार म्हणाले.