3.6 C
New York

Congress : क्रॉस व्होटिंगमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले आमदार, वरिष्ठांना सगळं माहित

Published:

vविधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या(Congress) माहित आमदारांची मतं फुटली. या फुटलेल्या मतांमुळेच महाविकास आघाडीला तिसरा उमेदवार निवडून आणता आला नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जशी भक्कम दिसली तशी विधानपरिषदेच्या निवडणुकीत का दिसली नाही. काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग करण्याचं कारण काय, आता या फुटीर आमदारांवर काय कारवाई होणार, फुटलेले आमदार आहेत तरी कोण असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यातच आता काँग्रेसचेच आमदार कैलास गोरंट्याल यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. कोणते आमदार फुटणार याची फक्त हिंट मी माध्यमांना दिली होती. पण पक्ष कार्यालयात वरिष्ठांना कोणते आमदार फुटणार याची माहितीच दिली होती.

विधानपरिषदेत क्रॉस व्होटिंग झालं त्यात तुमचंही नाव आलं. यात किती तथ्य आहे या प्रश्नावर गोरंट्याल म्हणाले, माझं नाव आलं हे लक्षात येताच सर्वात आधी मी वरिष्ठांना फोन केला. त्यांना हा प्रकार सांगितला. वरिष्ठांनी खुलासा केला की यात तुमचं नाव नाही. मग मी म्हटलं ज्यांची नावं असतील त्यांचा खुलासा करा. यावर वरिष्ठांनी नकार दिला. त्यांनी इतकंच सांगितलं की फुटीर आमदारांची नावं सोनिया गांधींना कळवली आहेत. यानंतर आमदारांच्या नावांचा खुलासा आपण करू असे वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितलं. पण तरीही आम्ही प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत असताना अशा पद्धतीने माझं नाव समोर आल्याने माझी बदनामी होत आहे हे बरोबर नाही अशी खंत आमदार गोरंट्याल यांनी व्यक्त केली.

पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांकडून ऑडी कार ताब्यात

Congress फुटीरांत पश्चिम महाराष्ट्रातील आमदार

चार आमदार फुटतील अशी शक्यता तुम्ही व्यक्त केली होती प्रत्यक्षात मात्र सात आमदार फुटले. याबाबत तु्म्हाला काय माहिती मिळाली होती असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी चार सांगितले होते त्यात आणखी तिघांची भर पडली. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांचा समावेश आहे. कोणत्या जिल्ह्यातील हे आमदार आहेत हे मी सांगू शकत नाही. पण सात आमदार फुटले हे खरं आहे याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेच देऊ शकतील. याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनाही माहिती आहे.

मतमोजणीनंतर रात्री दहा वाजेपर्यंत लक्षात आलं होतं की कोणत्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. यानंतर वरिष्ठ नेत्यांनी या आमदारांची नावं दिल्लीत पाठवून दिली आहेत. आमची अशी रणनीती होती की कोणत्याही परिस्थितीत तिन्ही उमेदवार निवडून यायलाच पाहिजे होते. परंतु, सात मतं फुटली. त्यामुळे शेकापच्या जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला.

Congress गद्दारांवर कारवाई झालीच पाहिजे नाहीतर..

ज्या कुणी गद्दारी केली त्यांचे नाव कोणत्याही परिस्थितीत समोर आलीच पाहिजेत. या आमदारांवर पक्षाला कारवाई करावीच लागेल. पक्षाची सत्ता येवो अगर न येवो पण या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे. नाहीतर जनताच त्यांना काय ते दाखवून देईल. मागील पंधरा दिवसांपासून अधिवेशन सुरू आहे. हे सर्व आमदार माझ्या आजूबाजूलाच बसायचे. त्यामुळे माझ्या तेव्हाच लक्षात आले होते की या लोकांची काहीतरी गडबड आहे. प्रसारमाध्यमांना मी फक्त संकेत दिले होते पण पक्ष कार्यलयात मी स्पष्टच सांगितलं होतं की कोणते आमदार फुटणार आहेत असा मोठा खुलासा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. यानंतरही असं काही होईल याची शक्यता आमच्या वरिष्ठांना वाटत नव्हती. तरीही हा प्रकार घडला, असे गोरंट्याल म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img