मुंबई
विधान परिषदेच्या निवडणुकीकडे (Vidhan Parishad Elections) सर्वच पक्षांचे लक्ष लागलं आहे. आज ही निवडणूक होत असून, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अजूनच काटे की टक्कर अशी होणार हे नक्की. दरम्यान त्या निवडणुकीच्या (MLC Election) पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगु लागल्या आहेत. म्हणाले, मिलिंद नार्वेकर हे ठाकरे गटाचे नव्हे तर सर्वांचेच उमेदवार आहेत. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकानंतर पहिलीच मोठी निवडणूक होत असून विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज सकाळपासूनच मतदान सुरू झालं आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली असून कोणाची विकेट निघणार याबाबत गुरुवारी तर्कवितर्क लढविले जात होते. आपापली मते फुटू नयेत यासाठी सर्व पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असले तरी क्रॉसव्होटिंग होण्याची आणि धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये, शिवसेना उद्धव ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्या विजयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी विशेष खबरदारी घेतली असून आपल्या आमदारांची गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच खातरदारी केल्याचं पाहायला मिळालं आहे.
विधानपरिषदेसाठी विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी, सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेसाठी एकूण 274 आमदारांचं मतदान होणार असून दुपारी 1.30 वाजेपर्यंत एकूण 246 आमदारांचं मतदान झालं आहे.
हे आहेत रिंगणात
भाजप : पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर
शिंदेसेना : भावना गवळी, कृपाल तुमाने
अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे
काँग्रेस : प्रज्ञा सातव
उद्धव सेना : मिलिंद नार्वेकर
शेकाप : जयंत पाटील