रमेश तांबे, ओतूर
शिरूर तालुक्यातील (Otur) शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत कार्यक्षेत्रात आपटी गावच्या हद्दीत अवैधरीत्या गावठी दारू (Illegal Liquor) निर्मिती व वाहतुक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क,नारायणगांव विभागाची एकाच महिन्यामध्ये दुसऱ्यांदा धडक कारवाई करून १० लाख ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग नारायणगावचे निरीक्षक एस.ए.गायकवाड यांनी दिली.
याप्रकरणी तेजस जीवन मन्नावत, वय २२ वर्षे, रा. हरगुडे वस्ती, स्पाईन रोड, चिखली, ता. हवेली,जि.पुणे व रोहीत प्रताप राठोड,वय २२ वर्षे, रा. जिल्हा परिषद शाळेजवळ, मुऱ्हे वस्ती, कुरळी, ता. खेड, जि.पुणे ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून,आरोपीं विरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्यामध्ये दोन चारचाकी वाहन, एक दुचाकी वाहन व ३७०० लिटर गावठी हातभट्टी दारूचे रसायन,१०५० लिटर गावठी दारू असा एकुण १० लाख ३५ हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना श्री गायकवाड म्हणाले की, दि.११ जूलै रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास शिक्रापुर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात आपटी गावाचे हद्दीत, भीमा नदीवरील बंधाऱ्या शेजारी ता.शिरूर जि.पुणे याठिकाणी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गावठी हातभट्टी निर्मितीच्या ठिकाणी अचानकपणे छापा घातला असता दोन हुंडाई कंपनीची चारचाकी वाहने क्रमांक अनुक्रमे एम एच १२ डीएस ५४५७ व एमएच ०२ ए एल ८७३७ या दोन्ही वाहनांमध्ये तपासणी केली असता ३५ लि. क्षमतेचे १९ प्लॅस्टीक कॅन मध्ये ६६५ लिटर हातभट्टी गावठी दारू मिळुन आली. तसेच एक बजाज कंपनीची फोर एस दुचाकी त्यावर एक ३५ लि. क्षमतेचे १ प्लॅस्टीक कॅन गावठी दारूने भरलेले मिळुन आले. तसेच ४०० लिटर क्षमतेचे १ लोखंडी भट्टी बॅरल त्यात अंदाजे ३०० लिटर रसायनाने भरलेले, जमिनीत रसायनाने भरलेल्या एका अंदाजे ४००० लिटर च्या खड्डड्यामध्ये अंदाजे ३००० लिटर रसायन, ४०० लिटर क्षमतेचा १ लोखंडी बॅरल रसायनाने भरलेला जमिनीत पुरलेला व ३५ लिटर क्षमतेचे १० प्लॅस्टीक कॅन अंदाजे ३५० लिटर गावठी दारूने भरलेले व गावठी दारू निर्मितीचे इतर साहीत्य् मिळून आले. असा एकुण १० लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणेचे विभागीय उपआयुक्त सागर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी.बी.राजपूत, पिंपरी चिंचवड विभागाचे उपअधीक्षक अधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभाग नारायणगावचे निरीक्षक एस.ए.गायकवाड, दुय्यम निरीक्षक एस.पी.जाधव,एस.एफ.ठेंगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक डी.डी.माने, तसेच सर्वश्री जवान, जे.जी.दाते,बी.एस.रणसुरे,एस.टी.सुर्वे व व्ही.डी.विंचुरकर आदिंनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उत्पादन शुल्क विभाग नारायणगावचे निरिक्षक एस.ए.गायकवाड हे करत आहेत.