रमेश औताडे, मुंबई
वीज ऊद्योगातील कंत्राटदार हटवून हरियाणा राज्यातील पध्दती प्रमाणे कंत्राटदार विरहीत शास्वत रोजगार द्यावा व इतर मागण्या घेऊन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार (Electricity Contract Workers) संघटनेने आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे.
वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न शासन, प्रशासन स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, आम्ही कंत्राटी कामगार विविध सनदशीर मार्गाने आंदोलन करित आहोत मात्र अद्यापपर्यंत शासनाने कोणतेही दखल घेतली नसल्याने आझाद मैदानात आम्ही आंदोलन सुरू केले आहे. सरकारने जर याप्रकरणी गांभीर्याने दखल घेतली नाही तर हे आंदोलन तीव्र करणार असा इशारा संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.
विधीमंडळात या बाबतीत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना सुध्दा वस्तुस्थिती न मांडता मुख्य मुद्दाच वगळला गेला.रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी कामगारांना वेतन वाढी बाबतीत वंचित ठेवले आहे. फक्त कायम कामगारांनाच वेतन वाढ घोषित करून कंत्राटी कामगारांची निराशाच केली आहे. या अगोदर आझाद मैदानावर लाक्षणिक निदर्शने केली होती. तेव्हाही सरकारला व वीज कंपनीला जाग आली नाही, त्यामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ महाराष्ट्र राज्यात जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आमरण उपोषण करत आहे असे अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले.
वीज ऊद्योगातील कंत्राटदार हटवून हरियाणा राज्यातील पध्दतीने कंत्राटदार विरहीत शास्वत रोजगार द्यावा , कायम कामगारांच्या प्रमाणे वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना जीवन वेतन प्रणाली प्रमाणे सन्मानजनक वेतनवाढ करावी, दोषी कंत्राटदार ब्लँक लिस्टमध्ये टाकून कारवाई करावी, आकसाने आणि सुडबुध्दीने नोकरी पासून वंचित असलेल्या कंत्राटी कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घेण्यात यावे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी सचिन मेंगाळे यांनी यावेळी केली.