मुंबई
काल मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली. या पार्श्वभूमीवर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी विरोधकांवर टिकास्त्र डागले आहे. मराठा आरक्षणाबाबतचे (Reservation) महाविकास आघाडीचे पुतना मावशीचे प्रेम दिसून आले, असे दरेकर म्हणाले. तसेच शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आरक्षणाविषयी आपली भुमिका स्पष्ट करावी. चर्चेपासून पळ काढू नये, असा टोलाही दरेकरांनी लगावला.
दरेकर म्हणाले की, सरकारने पुढाकार घेऊन आरक्षणाविषयी मार्ग काढावा आणि जातीय तेढ निर्माण झालेय ते संपवावे असा ज्येष्ठत्वाचा सल्ला शरद पवारांनी दिला होता. उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षण आणि ओबीसी विषय सोडवावा अशा प्रकारची भुमिका मांडताहेत. महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षाची मागणी, महाराष्ट्रातील वातावरण सलोख्याचे व्हावे याबाबत पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. परंतु विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शरद पवार, उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते जाणीवपूर्वक बैठकीला उपस्थित नव्हते. हा प्रश्न असाच भिजत राहावा आणि त्या आधारे महाराष्ट्रात जातीय संघर्ष राहावा, महाराष्ट्र पेटत राहावा, त्या पेटलेल्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भाजावी, अशा प्रकारचा नीच विचार मविआच्या नेत्यांच्या मनात असल्याचे कालच्या अनुपस्थितीवरुन दिसून आल्याचेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी या पक्षांची नेमकी काय भुमिका आहे ती लेखी स्वरूपात मागवा. ह्यांचे खरे रूप महाराष्ट्रातील जनतेसमोर येऊ दे असे बैठकीत सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सर्व पक्षांकडून लेखी भुमिका मागण्याचे ठरवले. त्यामुळे आज आम्ही विधानपरिषदेत हा विषय मांडला. काल शरद पवार, उद्धव ठाकरे नेमके का अनुपस्थित होते? काँग्रेसचे नेते का येऊ शकले नाहीत? याचा अर्थ त्यांना हे वातावरण असेच धगधगते राहावे, आपला काही स्वार्थ साधता येतोय का? एवढे नीच राजकारण करताना विरोधक दिसताहेत. काल आणि आज महाराष्ट्रातील जनतेसमोर त्यांचे खरे रूप समोर आलेय. शरद पवार, उद्धव ठाकरे यांची ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काय भुमिका आहे. यातून काय मार्ग काढायला हवा? हे सांगावे. चर्चेपासून पळ काढू नका. जितके पळाल तितका तुमचा ढोंगीपणा महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल, असा घणाघातही दरेकरांनी केला.