टीम इंडियाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) विश्वचषक विजयाचा पडद्यामागचा हिरो राहिला. वनडे विश्वचषकातील पराभवाची कसर त्याने टी 20 विश्वचषकात भरुन (T20 World Cup 2024) काढली. त्याच्या अनुभव आणि स्ट्रॅटेजीचा टीम इंडियाच्या (Team India) युवा खेळाडूंना मोठा फायदा झाला. राहुल द्रविडच्या याच कामगिरीची दखल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतली. बक्षीस म्हणून अडीच कोटी रुपये बोनस देऊ केला. पण, भारताच्या या माजी खेळाडूचा दिलदारपणा पहा त्याने ही रक्कम नाकारली.
बीसीसीआयने टी 20 विश्वचषक विजेता संघातील सदस्यांच्या बरोबरीने राहुल द्रविडलाही बोनस मिळणार होता. मात्र, द्रविडने बोनसची ही रक्कम घेण्यास नकार दिला आणि तितकीच रक्कम घेतली जितकी कोचिंग स्टाफला मिळाली. बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुलने कोचिंग स्टाफमधील सहकारी गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रे, फिल्डिंग कोच टी. दिलीप आणि फलंदाजी कोच विक्रम राठोड यांच्या इतकीच रक्कम घेण्यास इच्छुक होता.
जसप्रीत बुमराहला मिळाला ICC चा ‘हा’ बहुमान
बीसीसीआयने विजेत्या संघाला बक्षीस म्हणून 125 कोटी रुपये दिले होते. बोर्डाने तयार केलेल्या फॉर्म्युल्यानुसार विजेत्या संघातील 15 सदस्य आणि राहुल द्रविड यांना प्रत्येकी पाच कोटी रुपये मिळणार होते. सहकारी स्टाफला अडीच कोटी तर निवडकर्ते आणि राखीव खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये मिळणार होते. परंतु, राहुल द्रविडने मात्र यातील अडीच कोटी रुपये घेण्यास नकार दिला. त्याच्या या निर्णयाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.
ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी सन 2018 मध्ये भारताने अंडर 19 विश्वचषक जिंकल्यानंतरही द्रविडने असेच केले होते. त्यावेळी द्रविड अंडर 19 संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यावेळी द्रविडला 50 लाख रुपये आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये आणि संघातील खेळाडूंना प्रत्येकी 30-30 लाख रुपये देण्याचे ठरले होते. द्रविडने मात्र हा फॉर्म्युला नाकारला. सर्वांना समान पुरस्कार मिळावा असे त्यांना वाटत होते. यानंतर द्रविडसह कोचिंग स्टाफच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येकी 25 लाख रुपये देण्यात आले होते.