मुंबई
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्ष अमोल काळे (Amol Kale) यांचा अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान निधन झाले होते. यानंतर रिक्त असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदासाठी पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचा मुलगा विहांग सरनाईक (Vihang Sarnaik) याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहांग सरनाईक यांनीही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. सरनाईक सध्या मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या मुंबई प्रीमिअर लीगचे अध्यक्ष आहेत. तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील या निवडणुकीत अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच भाजपच्या वतीने प्रसाद लाड किंवा एमसीएचे विद्यमान सचिव अजिंक्य नाईक या दोघांपैकी एक जण अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. दरम्यान ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची रिक्त जागा भरण्यासाठी, एमसीएने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले असून, रिटर्निंग ऑफिसर जेएस सहारिया यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 4 ते 10 जुलै या कालावधीत दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील एमसीए लाउंजमधील रिटर्निंग ऑफिसरच्या कार्यालयात सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 11 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून त्यात ज्यांची नावे प्रस्तावित आणि मंजूर करण्यात आली आहेत त्यांचा समावेश असेल. त्याच दिवशी वैध उमेदवारांची घोषणा केली जाईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 16 जुलै रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. प्रसिद्धीनुसार, 23 जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केले जातील.