22.9 C
New York

Ajit Pawar : अजितदादांनी फोडला काँग्रेसचा हिरो

Published:

लोकसभा निवडणुकीत एक जागा हाती लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) खडबडून जागे झाले आहेत. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अस्तित्व या पुढेही ठेवायचे असल्यास आगामी विधानसभा निवडणूक ही शेवटची संधी असू शकते याची कल्पना त्यांना आलेली दिसते. त्यावरुनच अजित पवार यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी नरेश अरोरा (Naresh Arora) यांच्या खांद्यावर आपल्या पक्षाच्या प्रचाराची धुरा सोपविली आहे. जबाबदारी मिळताच अरोरा यांनीही अजित पवार आणि त्यांच्या आमदारांना विधान सभा निवडणुकीसाठीचा रोड मॅपही दिला आहे. नेमके कोण आहेत हे नरेश अरोरा आणि ते अजित पवार यांना काय मदत करु शकतात तेच आपण पाहू. (Ajit Pawar has entrusted Naresh Arora with the responsibility of election and campaign of NCP.)

प्रशांत किशोर, सुनील कनुगोलू यांच्याशिवाय एक यशस्वी राजकीय रणनीतीकार म्हणून नरेश अरोरा यांची ओळख आहे. राजकीय प्रचाराचे मॅनेजमेंट करणाऱ्या सुप्रसिद्ध DesignBoxed या कंपनीचे ते सह-संस्थापक आहेत. 2011 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती. पुढे ही डिजिटल मॅनेजमेंट कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. कंटेंट डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात नरेश अरोरा यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्लायंटसाठी काम केले आहे. पण अखेरीस त्यांच्या कंपनीने राजकीय प्रचार व्यवस्थापनात प्रवेश केला. नरेश अरोरा यांचा राजकीय रणनीतीकार म्हणून 2016 मध्ये प्रवास सुरू झाला. 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये काही मतदारसंघांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, ज्या भागांसाठी त्यांनी निवडणूक प्रचारात काम केले होते त्या सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.

बिझनेस स्टँडर्डमधील एका अहवालानुसार, पंजाब विधानसभा निवडणुकीत 22 काँग्रेस उमेदवारांच्या सोशल मीडिया प्रचाराचे व्यवस्थापन DesignBoxed ने केले होते. यानंतर त्यांनी गुरुदासपूर लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसला यशस्वीपणे जिंकवून दाखविली होती. 2017 मध्ये हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतही चार जागांसाठी अरोरा यांच्या कंपनीने निवडणूक प्रचार केला होता. त्यामुळे त्यांच्या कंपनीवर काँग्रेसचा विश्वास वाढत गेला. त्यानंतर अनेक निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ लागली. विशेष म्हणजे अरोरा यांनी आतापर्यंत केवळ काँग्रेस पक्षासाठी निवडणूक प्रचारात काम केले आहे.

वरळी हिट अँड रन प्रकरणी, राऊतांचे मोठे विधान

काँग्रेस आणि अरोरा यांनी एकत्रित काम केलेले कर्नाटक हे दहावे आणि राजस्थान हे अकरावे राज्य होते. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डीके शिवकुमार यांच्यासोबत नरेश अरोरा यांनी निवडणूक प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कर्नाटक निवडणुकीच्या दोन वर्षापूर्वीपासूनच डीके शिवकुमार यांच्यासोबत जमिनीवर काम केल्याचे अरोरा यांनी सांगितले होते. जनतेसाठी जमिनीवर सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळेच पक्ष विजयी झाला, असा त्यांचा दावा होता. नरेश अरोरा आणि त्यांच्या कंपनीने पंजाब पोलिसांसोबत अमली पदार्थांच्या व्यसनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी देखील काम केले आहे.

आता अरोरा यांच्यावर अजित पवार यांच्या पक्षाची धुरा सोपविण्यात आली आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या आमदारांना त्यांनी संबोधित केले. या बैठकीत नरेश अरोरा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे ब्रँडिंग आणि रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांसमोर मांडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांवर प्रकाश टाकत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाने 90 दिवसांची योजना आखली आहे.

अजित पवार यांची इमेज ब्रँडिंग करणे, त्यांची प्रशासकीय कौशल्ये, विश्वासार्हता आणि आश्वासने पूर्ण करण्याची वचनबद्धता यासारख्या काही प्लस पॉईंटवर प्रचार करण्यावरही पक्ष लक्ष केंद्रित करणार आहे. दरम्यान, आमदारांना विरोधकांच्या खोट्या विधानांकडे दुर्लक्ष करून विकास योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रचारावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही देण्यात आला. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबतच अरोरा आणि त्यांची कंपनीही कामाला लागली आहे. आता याचा कसा आणि काय परिणाम होईल हे निवडणुकीच्या निकालानंतरच दिसून येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img