4 C
New York

Anganwadi Sevika : मागणी दिवसाच्या निमित्ताने 30 वर्षाची परंपरा कायम

Published:

रमेश औताडे, मुंबई

अंगणवाडी कर्मचारी (Anganwadi Sevika) गेले 30 वर्षे 10 जुलै रोजी अखिल भारतीय मागणी दिवस साजरा करत आल्या आहेत. या वर्षीचा मागणी दिवस फक्त अंगणवाडी नाही तर सर्व कामगारांच्या मागण्या घेऊन जोरदारपणे पाळण्याचा निर्णय अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशन सिटू व सिटू या कामगार संघटनांनी घेत राज्यभर आंदोलन करत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात (Azad Maidan) अखिल भारतीय मागणी दिवस आंदोलन केले.

या दिवशी इतर सर्व योजना कर्मचारी व अन्य क्षेत्रातील कामगारांना सोबत घेऊन सिटू जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तालुका स्तरावर जोरदार मोर्चे काढण्यात येणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर आशा, अंगणवाडी कर्मचारी भर पावसात आंदोलन करून आपल्या मागण्या सरकारकडे पाठवल्या.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, किमान वेतन २६,००० व महागाई भत्ता लागू करा, मासिक पेन्शन व ग्रॅच्युइटी सहित सर्व सामाजिक सुरक्षा लागू करा, केंद्रीय व राज्य मानधनात ताबडतोब भरीव वाढ करा, आहाराच्या दरात तिपटीने वाढ करून दरडोई, दररोज २४ रु. व इंधन भत्ता ३ रु. करा, लाडकी बहिण योजनेच्या ऑनलाईन कामाची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देऊ नका. या अंगणवाडी च्या मागण्या आहेत.

तर आशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या म्हणजे , एनएचएम आशांना राज्याची घोषित मानधन वाढ ताबडतोब द्या. त्या व्यतिरिक्त प्रोत्साहन भत्ता द्या, बीएमसी आशांना एनएचएम मध्ये समाविष्ट करून समान वेतन व सर्व लाभ द्या, सर्व आशांना नियुक्ती पत्र, ओळखपत्र व पगाराची स्लिप द्या या आहेत.

तर इतर सर्व कामगारांच्या सामाईक मागण्या म्हणजे, कामगार विरोधी व मालक धार्जिण्या ४ श्रमसंहिता रद्द करा, राष्ट्रीय रोखीकरण पाईपलाईन व सर्व प्रकारचे खाजगीकरणाचे प्रयत्न रोखा, सर्व कामगारांना २६,००० रुपये किमान वेतन द्या, कंत्राटदार बदलला तरी सर्व कंत्राटी कामगारांना कायम ठेवून समान कामाला समान वेतन द्या, कामगारांची देणी थकवणाऱ्या आस्थापनांचा दंड कमी करण्याची अधिसूचना रद्द करा, अंगणवाडी, आशा, मध्यान्ह भोजन व इतर सर्व योजना कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लागू करा. या मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी शुभा शमीम, आरमायटी इराणी, संगीता कांबळे, स्वाती तांडेल या संघटनेच्या पदाधिकारी व शेकडो महिला उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img