Worli Hit And Run Case: वरळीमधील हिट अँड रन (Hit And Run) हे प्रकरण सध्या चांगलाच गाजताना दिसत आहे. रविवारी पहाटे झालेल्या बीएमडब्ल्यू (BMW Car) कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती गंभीर जखमी झाले. ज्या कारने अपघात झाला ती कार शिवसेना शिंदे गटातील उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह चालवत होता. अपघात झाल्यानंतर तिथे थांबून पीडितांची मदत न करता मिहीरने लगेचच तिथून पळ गाठली. या अपघातात कावेरी नाखवा ह्या महिलेचा मृत्यू झाला. मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांची ती बहीण आहे. कावेरी यांच्या धक्कादायक मृत्यूमुळे वाडकर यांना प्रचंड धक्का बसला असून त्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. जयवंत वाडकर यांनी म्हटलंय की, आरोपीला लवकरात लवकर अटक व्हायला हवी अशी त्यांनी मागणी केली. आणि यांचा पैशाचा माज आणि उद्दामपणा जो आहे तो थांबला पाहिजे, अश्या लोकांना फटके दिल्याशिवाय पर्याय नाहीये असं ते म्हणाले.
Worli Hit And Run Case: या घटनेची माहिती वाडकर यांना रविवारी सकाळी समजताच ती बातमी ऐकून ते हादरून गेले. आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच घटना घडत असतात, नागपूर, पुण्यामध्येही हिट अँड रनची दुर्घटना घडली आहे. त्यावर आपण फक्त चर्चा करत असतो. पण रविवारी ही घडलेली घटना ऐकूनच मी हादरूनच गेलो. माझा या गोष्टीवर विश्वासच बसेना. असं त्यांनी नमूद केलं.
‘ती’ जादू पुन्हा दाखवा अन्यथा.. कल्याणमधील पाणी प्रश्नावर मनसेचा इशारा
मी तिला पाहू शकलो नाही…
Worli Hit And Run Case: मी कावेरीला शेवटचं पाहूदेखील नाही शकलो. माझं शूटिंग आणि नाटकाचे प्रयोग सुरु असल्याने मला तिथे जातसुद्धा आलं नाही, पण माझा मुलगा आणि भाऊ तिकडे पोहोचले होते, त्यांनी जे सांगितलं ते मला ऐकवलच नाही. पण ज्या पद्धतीने तो प्रकार झाला तो अतिशय भयानक आहे. या घटनेनंतर मी माझ्या भावोजी प्रदीप (कावेरी यांचे पती) याच्यांशी बोललो पण त्यावेळी त्यांनी मला जे सांगितलं ते ऐकून शब्दच फुटेना. ते त्या ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगत होते, मात्र त्याने गाडी तशीच अंगावरून नेली असं संतप्त वाडेकर यांनी नमूद केलं.
मला बहिणीची खूप आठवण येईल
कावेरीची मला खूप जास्त आठवण येणार आहे. चिराबाजार येथे आमचा पारंपरिक गणपती असतो, विशेष म्हणजे मला त्यावेळी तर कावेरीची जास्त आठवण येईल. कारण गणेशोत्सव आला की ती सकाळी उठून दादरला जाऊन फुलं आणायची, गणपतीची कंठी, विविध दागिने बनावयची, आणि सजावट करायची. जेवणाची तयारीसुद्धा ती आवडीने आणि उत्साहाने करायची. तिचा सर्वत्र वावर पाहायला मिळायचा. तिची अनुपस्थिती आम्हाला खूप जाणवणार आहे. असं सांगताना जयवंत वाडकर खूपच भावुक झाले.
ती इतकी मेहनती मुलगी होती ना, खरंच. वरळी गावात ती लग्न करून गेली आणि तिला दोन मुलं आहेत. तिच्या २ मुलांना तिने मेहनतीने मोठं केलंय. दोन्ही मुलं आता चांगला जॉब करत आहेत त्यांचं घर छान मोठं झालं होत. तरीही ती रोज सकाळी उठून ससून डॉकला जायची, मासे घेऊन विकायची, पतीला सोबत करायची. आणि मी तिला म्हणायचोसुद्धा की, आता तर तुझी दोन्ही मुलं मोठी झाली आहेत. चांगली कामाला लागली आहेत, आता हे काम नको करुस. पण तरीही ती मेहनत करतच राहिली. बहिणीच्या आठवणीत जयवंत वाडकरांचे अश्रू दाटले होते. तिच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरलेल्या आरोपीला लवकरात लवकर शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करून शिक्षा व्हायलाच पाहिजे. अशी, मागणी जयवंत वाडकर यांनी केली आहे.