बंगळुरू
रात्री उशिरापर्यंत पब (Pub) चालवल्याप्रकरणी बंगळुरू येथील विराट कोहलीच्या (Virat Kohli) मालकीच्या पबवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बंगळुरू पोलिसांनी (Bangalore Police) विराट कोहलीच्या मालकीच्या वन 8 कम्युन पब आणि एमजी रोडवरील इतर अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटविरुद्ध निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे. हे पब पहाटे 1.30 वाजेपर्यंत उघडे असल्याचे आढळले. नियमानुसार मध्यरात्री 1 वाजता पब बंद करणे आवश्यक होते.
रात्री उशिरा या परिसरात मोठ्या आवाजात संगीत सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमजवळील वन 8 कम्युन पब हे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पबपैकी एक आहे. विराट कोहलीच्या One8 कम्युनच्या दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोलकाता सारख्या इतर मेट्रो शहरांमध्येही शाखा आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बंगळुरू शाखा सुरू करण्यात आली होती. हा पब रत्नम कॉम्प्लेक्सच्या सहाव्या मजल्यावर आहे.
विराट-कोहलीच्या मालकीची रेस्टॉरंट साखळीही गेल्या वर्षी चर्चेत होती जेव्हा दिल्ली उच्च न्यायालयाने One8 कम्युनला गाणी वाजवण्यापासून रोखले होते ज्यांचे कॉपीराइट फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड (पीपीएल) च्या मालकीचे होते.