मुंबई
पुण्यातील माजी नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा लढवलेल्या वसंत मोरे (Vasant More) यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली होती. वसंत मोरे यांनी आज मंगळवारी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ते पुन्हा एकदा स्वगृही परतले आहेत.
आज गाड्यांचा मोठा ताफा, हातात भगवे झेंडे घेत वसंत मोरे यांनी मुंबई गाठली. वसंत मोरे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जात ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी काही नगरसेवक, शाखाध्यक्ष, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
उद्धव ठाकरे म्हणाले की, वसंत मोरेंसह आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व बांधवांनो आणि भगिनींनो लोकसभेआधी आम्ही सर्वजण बघत होतो, वसंतराव काय करतात हे बघत होतो. काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण एका गोष्टीचं मला नक्कीच समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात. मधल्या काळात शिवसेनेच्या बाहेर पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो, याचा अनुभव घेतला आणि तो अनुभव घेऊन तुम्ही अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतला आहात. त्यामुळे आज तुमचं महत्त्व, काम आणि जबाबदारी फार मोठी आहे. मी शिवबंधन बांधत असताना काहींनी मला आम्हीही शिवसैनिक होतो, असं सांगितलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मग आता तुम्हाला शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा ही झालीच पाहिजे. ती वसंत मोरेंनाही व्हायला पाहिजे. मी तुम्हाला देतोय ती शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यात शिवसेना वाढवून हवी आहे. ती वाढवण्याची जबाबदारी मी वसंत मोरेंना देतोय. शिक्षा हा गंमतीशीर शब्द आहे तो तशा पद्धतीने घेऊ नका. पण ही जबाबदारी म्हणून घ्या. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने देशाला एक दिशा दाखवली आहे. ती लढाई लोकशाही, संविधान वाचवण्याची होती. आता जी लढाई होईल ती गद्दारी धोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची होणार आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वाची ती लढाई असणार आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.