रमेश औताडे, मुंबई
भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा छत्तीसगड मधील देवगहान – गुंडेरदेही येथे 5 एकर जागेमध्ये स्व:खर्चाने मी पुतळा बसवला आहे. या ठिकाणी कारगील व चीन मधील गलवान घाटी युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांची छायाचित्रे लावली आहेत. या क्रीडांगणचे येत्या 15 आगस्ट रोजी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते उदघाटन करण्याचा मानस आहे. सचिन यांच्या कार्यालयासोबत पत्रव्यवहार देखील केला आहे .मात्र त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. जर सचिन तेंडुलकर या उदघाटनाला आले नाही तर त्यांचा तो पुतळा तोडून त्यांच्या जागी शहीद भगतसिंग व चंद्रशेखर आझाद यांचा पुतळा उभारण्यात येईल असा इशारा देवगहान – गुंडेरदेही चे माजी सरपंच लोकेंद्र साहू (Lokendra Sahu) यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
‘बेटी बचाव बेटी पडाव’ हा संदेश पाहून साहू यांनी दोन मुलींवर कुटुंब नियोजन करण्याचा निर्णय घेतला. लहान मुलगी तान्या हिच्या जन्माचे औचित्य साधून त्यांनी दोन वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर यांचा १२ लाख रुपये खर्चून स्वतःच्या शेतात गार्डन बनवून पुतळा बसविला. साहू हे एक क्रिकेट खेळाडू आहे .भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते शिक्षण सोडून २००१ – ०२ मध्ये मुंबई नॅशनल क्रिकेट क्लब येथे कोचिंग घेण्यासाठी आले होते. परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
माझी मुलगी अजूनही सचिन यांची वाट पाहत आहे. ती दररोज सचिनच्या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन सचिनला विचारते ” सचिन सर आमच्या घरी कधी येणार” ? रक्षाबंधनाच्या वेळी माझ्या मुली सचिनच्या पुतळ्याच्या मनगटावर राखी बांधतात आणि प्रत्येक सणाला शुभेच्छा देण्यासाठी जातात आणि दरवर्षी 24 एप्रिलला सचिनचा वाढदिवस पुतळ्यासमोर केक कापून साजरा करतात.
येत्या १५ आगस्ट रोजी वीर जवानांचे छायाचित्रांचे उदघाटन करण्यासाठी जर सचिन तेंडुलकर आले नाही तर त्यांचा तो पुतळा तोडून त्यांच्या जागी शहीद भगतसिंग व चंद्रशेखर आझाद यांचा पुतळा उभारण्यात येईल असा इशारा देवगहान – गुंडेरदेही माजी सरपंच लोकेंद्र साहू यांनी पत्रकार परिषदेत दिला.