मुंबई
राज्यात अँम्बुलन्स घोटाळा (Ambulance Scam) झाला आहे. या खरेदीत टेंडर फुगवले गेले असून तीन हजार कोटींचे काम दहा हजार कोटींवर नेले आहे. 30 टक्केच्यावर कमिशन या घोटाळ्यात घेतले गेले आहे. हा अँम्बुलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी केला जातोय, या घोटाळ्यात किती नेत्यांचे खिसे गरम झालेत, असे सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत (SIT Inquiry) चौकशी करण्याची मागणी आज विधानसभेत केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र लुटा आणि गुजरातला वाटा, अशा शब्दात त्यांनी सरकारचे वाभाडे काढले.
वडेट्टीवार म्हणाले की, अँम्बुलन्स घोटाळा हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हे सरकार रूग्णांच्या टाळूवरचे लोणी खात आहे. सनदी अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याला विरोध केला म्हणून त्यांची बदली देखील झाली. निवडणूक फंडासाठी हा उद्योग सुरू आहे. आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघत असताना हा घोटाळा केला जात आहे. महाराष्ट्र लूटून साफ करण्याचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, कांदाटी खोऱ्यातील जमीन खरेदी करताना कमाल मर्यादा पायदळी तुडविली. वन जमिनीतून रस्ते खोदून काढले, खोदकाम करताना महसूल विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. महसूलच्या जागेतून रस्ते काढले. करोडो रुपयांचा महसूल बुडाला. ज्या ठिकाणी वन कायद्याचे उल्लंघन झाले. अवैध्य बांधकाम सुरू केले, जंगलतोड केली, पर्यावरणाचा धोका निर्माण झाला. विशेष म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा हा परिसर आहे. तरी देखील राजरोसपणे हे सगळ सुरू आहे. सरकार त्यावर का कारवाई करत नाही असा सवाल वडेट्टीवार यांनी विधानसभेत वनमंत्र्यांना केला.