मुंबई
पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर (Pune Hit And Run Case) वरळीतील हिट अँड रन प्रकरणानं (Worli Hit And Run Case) सर्वांना हादरवलं आहे. वरळीत शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या (Shinde Group) उपनेत्याच्या मुलानं एका महिलेला आपल्या महागड्या गाडीनं चिरडलं. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या उपनेत्याला अटक केली आहे. पण, अपघातावेळी गाडीत उपस्थित असलेला शिवसेना उपनेत्याचा मुलगा आणि अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) मात्र अद्याप फरार आहे. आता मिहीर शाह विरोधात लूक आऊट नोटीस (Lookout Notice) जारी करण्यात आली आहे.
वरळी हिट अॅन्ड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शाह विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मिहीर शाह 24 तासांपासून फरार आहे. या प्रकरणात त्याचे वडील राजेश शहा आणि चालक यांना अटक करण्यात आली आहे. मिहीरच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना झाली असून तो परदेशात पळून जाणार असल्याचा संशय पोलिसांना आहे.
अपघात प्रकरणात मिहीर शहाचे वडील राजेश शाह आणि चालक राजऋषी बिदावत यांना आजच न्यायालयात हजर केलं जाणार आहे. शिवडी कोर्ट नं 62 मध्ये दोन्ही आरोपींना आज दुपारी हजर केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं पाठवली आहेत. पोलीस तपासांत समोर आलेली धक्कादायक माहिती म्हणजे, वरळी अपघातापूर्वी मुख्य आरोपी मिहीर शाहनं आपल्या चार मित्रांसोबत मद्यप्राशन केलं होतं. 18 हजार 730 रुपये त्यांचं बिल झालं होतं. पोलिसांनी सीसीटिव्हीचा डीव्हीआर जप्त केला.