मुंबई
मुंबईसह परिसरात सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, बदलापूर अंबरनाथ, कर्जत या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक सखोल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तसेच याचा परिणाम मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल वर देखील झाला आहे. मध्य रेल्वे हरभर रेल्वे ट्रान्सफर तसेच पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. तर मध्य रेल्वेच्या अनेक रुळावर पाणी साचलं आहे. मात्र आता पुन्हा हवामान विभागाने (Rain Alert) मुंबईला पुढील काही तास धोक्याचं असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आवश्यक असल्यास घराबाहेर पडा अशा देखील सूचना देण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील तीन ते चार तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना हवामान विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, मुंबईत सोमवारी दुपारी 1 वाजून 57 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रात 4.40 मीटरच्या लाटा उसळतील. अशावेळी मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास पावसाच्या पाण्याचा निचरा होणार नाही. त्यामुळे रस्त्यांवर आणखी पाणी साचू शकते, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. ज्यामुळे आता मुंबईतील शाळा आणि महाविद्यालय देखील बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुटी जाहीर केली आहे. मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाची पुढील स्थिती पाहून दुसऱ्या सत्रातील शाळा होणार की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा अंतिम आठवडा आहे. त्यामुळे अधिवेशनाकरिता विदर्भ मधून येणारे तसेच कोल्हापूर वरून येणाऱ्या आमदार तसेच मंत्री एक्सप्रेस गाड्यांमध्ये रखडले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना देखील पावसाचा फटका बसला आहे अनिल पाटील यांनी चक्क रुळावरून प्रवास करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.