मुंबई
मुंबईसह ठाणे, पालघर व आजूबाजूच्या जिल्ह्यांना मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाने (Heavy Rain) झोडपून काढले आहे. यामुळे सकाळीच नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली असून याचा फटका अनेकांना बसला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Minister Anil Patil) यांनाही या पावसाचा फटका बसला असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक कोलमडल्याने अनेक आमदार हे एक्सप्रेसमध्ये अडकले आहेत. तर मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांनी रेल्वे ट्रॅकवरून प्रवास केला आहे. त्याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील अनेक आमदार हे ट्रेनमध्ये अडकले आहेत.
काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळं मुंबईतील काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यांवर, रेल्वे ट्रकवर सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. याचा परिणाम वाहतुकीवर देखील झाला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे गाड्या मध्येच अडकून पडल्या आहेत. याचा फटका मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, ट्रेनमधून उतरुन रेल्वे ट्रकवरुन चालतानाचा एक व्हीडिओ समोर आला. यामध्ये मंत्री अनिल पाटील आणि आमदार मिटकरी चालताना दिसत आहेत. तसेच अमोल मिटकरी त्यांच्या परिस्थितीबाबत माहिती देताना दिसत आहेत. आणखी आठ ते दहा आमदार आम्ही असलेल्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आज आम्ही वेगळा अनुभव घेतोय. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा अंतिम आठवडा आहे. रेल्वेची वाहतूक लवकर सुरळीत होईल, अशी अपेक्षा असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, आज मुंबईस राज्यातील इतरही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळं काही भागात वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.