सातारा – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी (Ashadhi Wari) सोहळ्याचं पुणे जिल्ह्यातून शनिवार, दि. ६ रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणंदनगरीसह जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. पालखी सोहळ्याचा तब्बल पाच दिवस सातारा जिल्ह्यात मुक्काम आहे. नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घातल्यानंतर सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात प्रवेश होईल.
Ashadhi Wari सातारा जिल्ह्यात माऊलींचा पाच दिवस मुक्काम
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यंदा पाच दिवस सातारा जिल्ह्यात मुक्कामी आहे. शनिवारी (दि. ६ जुलै) रोजी पालखी सोहळ्याचं सातारा जिल्ह्याच्या हद्दीत आगमन झाल्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. ११ जुलै रोजी पालखी सोलापूर हद्दीत प्रवेश करेल.
Ashadhi Wari पालखी सोहळा बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा
पालखी सोहळ्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे एकूण ८० अधिकारी आणि ८०० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बंदोबस्ताच्या नियोजनासाठी डिजीटल ॲप तयार करण्यात आलं आहे. त्याच्या आधारे पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कर्तव्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्य सरकारचा मुलींसाठी मोठा निर्णय, ‘या’ अभ्यासक्रमाच्या 100 टक्के शुल्क माफ
Ashadhi Wari पालखी मार्गावर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेऱ्यांची नजर
पालखी मार्गावर नजर ठेवण्यासाठी पोलीस दलाने ड्रोन कॅमेरे तैनात केले आहेत. त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवता येणार आहे. याशिवाय पालखी जाणाऱ्या मार्गावर विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अनुचित प्रकार घडत असल्यास पोलिसांना त्याची त्वरीत माहिती मिळू शकणार आहे.
Ashadhi Wari विभागीय आयुक्तांकडून पालखी तळाची पाहणी
पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथील पालखी तळाची पाहणी केली. वारकऱ्यांना मुक्कामांच्या ठिकाणी आवश्यक सुविधा देण्याबरोबरच निर्मलवारी आणि हरितवारीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे निर्देशही डॉ. पुलकुंडवार यांनी दिले.