जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ब्रिटेनच्या सार्वत्रिक निवडणुकांचे (UK Elections 2024) निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत ब्रिटेनमध्ये सत्तापालट झाला असून पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या कंजर्वेटिव्ह पार्टीचा दारुण पराभव झाला आहे. लेबर पार्टीने (Labour Party) मोठे बहुमत मिळवत सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वातील कंजर्वेटिव्ह पार्टीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या निकालानंतर आता ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. यानंतर आता लेबर पार्टीचे कीर स्टार्मर पंतप्रधान होतील. लेबर पार्टीने आतापर्यंत 650 पैकी 500 घोषित झालेल्या निकालात 348 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. ब्रिटनमध्ये कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करायचे असेल तर 326 जागांची आवश्यकता असते. यामध्ये लेबर पार्टी बहुमत मिळवत 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनुसार लेबर पार्टीला 410 ते 460 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ताज्या आकडेवारीनुसार 650 पैकी 500 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये 348 जागा जिंकून लेबर पार्टीने बहुमताचा आकडा पार केला आहे.
जगातील ‘या’ दहा देशांत प्रचंड गरीबी, उत्पन्नातही घट
UK Elections 2024 सुनक राजीनामा देणार
निवडणुकीतील दणदणीत पराभवानंतर मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी स्टार्मर यांना शुभेच्छाही दिल्या. सुनक म्हणाले, लेबर पार्टीने मोठा विजय मिळवला आहे. यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल आले त्यानुसार आज निवडणुकीचे निकाल येत आहेत.
UK Elections 2024 कोण आहेत कीर स्टार्मर ?
कीर स्टार्मर यांचा जन्म 1963 रोजी झाला. त्यांचे वडील टूलमेकर होते. आई नर्स होती. त्यांनी लेबर पार्टीचे संस्थापक कीर हार्डी यांच्या नावावरून मुलाचं नाव कीर स्टार्मर ठेवलं होतं. कीर स्टार्मर 2015 मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 2020 मध्ये त्यांनी पूर्ण लेबर पार्टीचे नेतृत्व आपल्या हाती घेतले. कीर स्टार्मर यांनी अनेक वेळा त्यांच्या वक्तव्यांतून भारताबाबत सकारात्मक दृष्टीकोन दाखवला होता. त्याचा परिणाम असा झाला की या निवडणुकीत लेबर पार्टीला ब्रिटनमधील भारतीयांनी भरभरून साथ दिली.