मुंबई
सहकार चळवळ महाराष्ट्रात (Co Operative Movement) वाढवण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे. राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याबरोबरच ग्रामीण भाग आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यात सहकार क्षेत्राची महत्वाची भूमिका राहिली आहे. देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकार चळवळ रुजली परंतु आता ही सहकार चळवळच मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजपाचे केंद्र सरकार करत आहे, असा हल्लाबोल करत राज्यातील सहकार क्षेत्र जिवंत ठेवायचे असेल तर सत्ता परिवर्तन करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दैदिप्यमान यश मिळवून दिल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा प्रदेश काँग्रेसच्या सहकार विभागाकडून टिळक भवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, आमदार अभिजित वंजारी, आमदार डॉ. प्रज्ञा सातव, आ. धीरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन प्रमोद मोरे, सहकार विभागाच्या अध्यक्ष ऍड. शुभांगी शेरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकार त्यांच्याबरोबर असलेल्यांना भरघोस मदत करते. राज्यातील साखर कारखान्यांना केंद्र सरकारने मोठी आर्थिक मदत दिली. सरकारच्या बगलबच्च्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यास मात्र त्यांच्याकडे पैसे नाहीत. दर पाच वर्षांनी सहकार क्षेत्रात निवडणुका घेतल्या जातात पण मागील १४ वर्षात निवडणुकाच झाल्या नाहीत. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्याही निवडणुका घेतल्या जात नाहीत. भाजपाला जनता कंटाळली आहे, निवडणुका घेतल्या तर त्यांचा पराभव होणार याची त्यांना भिती वाटते. लोकसभा निवडणुकीत १६५ खासदार हे २०० ते २००० मतांनी विजयी झाले आहेत, जनतेला परिवर्तन हवे आहे पण गाफील राहू नका, सतर्क रहा, काम करा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी करा, असेही नाना पटोले म्हणाले.