मुंबई
राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) आणि ओबीसी (OBC) विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सूट देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या (Cabinet Decision) बैठकीत घेण्यात आला आहे.
ईडब्ल्यूएस, एसईबीसी तसेच इतर ओबीसी विद्यार्थिनींसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत या विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के सूट देण्यात येत होती. मात्र आता त्यांना १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मिळणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थिनींच्या शिक्षणाची समस्या सुटणार आहे.
राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देईल. यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना अधिकाधिक संधी उपलब्ध होतील.
यापूर्वी महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी नवीन योजना सुरू केली आहे. लेक लाडकी योजना असे या योजनेचे नाव आहे. योजनेंतर्गत मुलींना आर्थिक सुरक्षा दिली जाईल. यामध्ये मुलगी जन्माला येताच तिला आर्थिक मदत केली जाते.