पुणे
पुण्यातील (Pune) सोशल मीडिया स्टार नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत ठाकरे यांच्या शिवसेनेची (Uddhav Thackeray) वाट धरली. यामुळे वंचितचे (Vanchit Bahujan Aghadi) कार्यकर्ते संतापले आहेत. हडपसरच्या सरोदे नावाच्या कार्यकर्त्याने वसंत मोरे यांचे ऑफिस फोडण्याचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी मोरेबागेतील वसंत मोरे यांच्या ऑफिससमोर बंदोबस्त वाढवला आहे.
वसंत मोरेंनी आज दि.4 शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचितचा मार्ग निवडला होता. त्यांनी वंचितमधून पुणे लोकसभाही लढवली होती. मात्र, त्यांना मोठ्या परभवाला समोरे जावे लागले. त्यानंतर आता मोरेंनी वंचितसह प्रकाश आंबेडकरांना गुड बाय करण्याचं निश्चित केले असून, येत्या 9 जुलै रोजी वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
येत्या काळात राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे. मोरेंनी काही दिवसांपूर्वी खासदारकीचीही निवडणुक लढवली होती. मात्र, तेथे त्यांना दारूण पराभव झाला. त्यानंतर आता त्यांनी विधानसभेसाठी कंबर कसली असून,ते ठाकरे गटाकडून हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आजच्या भेटीत या जागांबाबतही ठाकरे आणि मोरेंमध्ये खलबतं झाली असल्याची शक्यता आहे.