20.9 C
New York

Shweta Shinde : अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरी चोरी करणारे चोर गजाआड

Published:

सातारा

साताऱ्यातील पिरवाडीत राहणाऱ्या अभिनेत्री श्वेता शिंदे (Shweta Shinde) यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून घरातील दागिने लंपास करणाऱ्या सराईत (Robbery) चोरट्यास सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. राजकुमार उर्फ राजू ओंकारप्पा आपचे (रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव), असे चोरट्याचं नाव आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

अभिनेत्री श्वेता शिंदे या आपल्या आईसोबत पिरवाडी (ता. सातारा) येथे राहतात. शुटींगच्या निमित्ताने आई सोबत त्या मुंबईला गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून कपाटातील ३ लाख ८२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला होता. तसेच श्वेता शिदे यानी पोलीस अधीक्षकाची भेट घेवून त्यांना घरफोडीची माहिती दिली होती.

पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील यांचे पथक तयार केले होते. तपासा दरम्यान राजकुमार उर्फ राजू ओंकारप्पा आपचे याने घरफोडी केली असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना दिली.

एलसीबीच्या पथकाने सातारा शहर परिसरात वावरत असलेल्या संशयिताला रात्रगस्तीवेळी वाढेफाटा परिससरात सापळा रचून ताब्यात घेतले. तपासात संशयिताने सातारा शहर, भुईज आणि लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून तीन गुन्ह्यातील १८.३ तोळ्याचे तसेच चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, असा एकूण १३ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) नोव्हेंबर २०२२ पासून आजअखेर दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे २९२ गुन्हे उघडकीस आणत ६ किलो ८४५ ग्रॅम वजनाचे दागिणे, १२ किलो चांदी, असा ४ कोटी ७८ लाख ३१ हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. याबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी एलसीबी पथकाचे कौतुक केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img