सातारा
सातारा जिल्ह्याच्या (Satara) पश्चिम भागात कोसळणाऱ्या पावसामुळे घाट मार्गावर दरडी कोसळत आहेत. गुरुवारी पहाटे सज्जनगड (Sajjangad) मार्गावर मोठी दरड कोसळल्यानं संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. दुपारी दरड हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. गुरुवारी पहाटे सज्जनगड मार्गावर मोठी दरड कोसळली. त्यामुळे यवतेश्वर, सज्जनगड, ठोसेघर, केळवली, तापोळ्याकडे जाताना पर्यटकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
सज्जनगडाकडे जाणाऱ्या मार्गावर पहाटे भली मोठी दरड कोसळली. सज्जनगड बस स्टँडपासून काही अंतरावरच ही घटना घडली. मोठमोठे दगड रस्त्यावर आले. दरडीबरोबर चिखल आणि छोटी झाडे मोडून खाली आली. दरडीमुळे सज्जनगड मार्गावरील संपूर्ण वाहतूक सकाळपासून ठप्प होती. प्रशासनाने तातडीने दरड हटविण्याचे काम हाती घेतल्याने दुपारनंतर वाहतूक सुरू झाली.
पश्चिम भागातील पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. बुधवारी तापोळा-महाबळेश्व मार्गावर दरड कोसळली होती. तसेच कास मार्गावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पश्चिम भागातील धबधबे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. त्यांनी घाट मार्गावरून जातान अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे.
धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांनी अतिउत्साहीपणा टाळून निर्सगाचा आनंद घ्यावा. धबधब्याच्या पाण्यात उतरू नये. तसेच दरड प्रवण क्षेत्रातून प्रवास करताना खबरदारी घ्यावी. पावसाचा जोर असताना घाट मार्गातून प्रवास टाळावा. पाऊस थांबल्यानंतर परिस्थितीची माहिती घेवून पुढे मार्गक्रमण करावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.