रमेश औताडे, मुंबई
वस्तू व सेवा कर विभागाची पुनर्रचना (Goods and Services Tax Employees) आणि सुधारित आकृतीबंध 2024 यामध्ये कर्मचारी संवर्गावर सरकारने अन्याय केला असल्याने काळ्याफिती लावून असंतोष आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (Goods and Services Tax Staff) कर्मचारी संघटनेने दिला आहे.
वस्तू व सेवा कर विभागाच्या पुनर्रचनेमध्ये कर्मचारी संवर्गावर झालेला अन्याय, वाढीव जागेसंदर्भात प्रशासनाकडून मिळत असलेला नकारात्मक प्रतिसाद व सुधारित आकृतीबंध 2024 मध्ये कर्मचारी संवर्गावर निर्माण करण्यात आलेली तातडीची स्थानांतरणाची परिस्थिती या सर्व बाबींमुळे विभागामध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस अजित भोसले यांनी दिली.
महाराष्ट्रातील सर्व विभाग कार्यालयात कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून राज्यभर हे आंदोलन 9 व 10 जुलै रोजी करण्यात येणार आहे. शासनाकडे या विभागाचा पुनर्रचना प्रस्ताव सादर करून या विभागाची निकड पाहता प्रस्तावित केलेली अंदाजित ७९९ राज्यकर निरीक्षकांची व ११७ कर सहायकांची वाढीव पदे न मिळाल्याने हा असंतोष पसरला आहे.
सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने सरकार आमच्या मागण्या मान्य करत आहे. 1 जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कर कायदा अंमलात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारही करणार होते. मात्र राज्य सरकार मनमानी कारभार करत कायद्याला मानत नाही. वाढलेले काम व अपुरे कर्मचारी याचा मेळ साधताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. समिती स्थापन करायची व त्या समितीच्या अहवालावर अंमलबजवणीबाबत काहीच करायचे नाही.त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. सरकारने जर याप्रकरणी गांभीर्याने विचार केला नाही तर पुढील आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे.