रमेश औताडे, मुंबई
राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने २३ जुलै रोजी मंत्रालय आरसा गेट सहित सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लंच टाईम मध्ये आम्ही निदर्शने करणार आहोत. तरीही सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर २५ जुलै रोजी आझाद मैदान या ठिकाणी राज्यव्यापी धडक मोर्चा आणून या सरकारला जागे करण्याचे काम करू असा इशारा राज्य सरकारी गट – ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी (Class 4th Employees Strike) मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र या संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक आयोजित करुन दिली जाते. परंतु मुख्य सचिव यांना आमच्या मागण्या सांगितल्या असता त्या मागण्या मंजूर करणे हे माझ्या हातात नसून मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे असे सांगण्यात येते असे भाऊसाहेब पठाण यांनी सांगितले. महाराष्ट्रातून साडेचार लाख रिक्त पदा पैकी फक्त १ लाख जागेवर भरती केली आहे. विशेष करून फक्त पोलिस भरती केली जाते आणि इतर जागेवर खाजगी सेवे तर्फे कर्मचारी भरले जातात. खाजगी भरतीला आमचा विरोध आहे. तसेच अनुकंपा भरती देखील पाच वर्ष भरली नाही. अनुकंपा प्रकरणात वयाची मर्यादा उलटून गेल्यावर त्यांना घेतले जात नाही मग त्यांनी काय करायचे ? असा सवाल पठाण यांनी केले.
अनुकंपा भारती विनाअट करून लाड – पागे समितीच्या शिफारशी नुसार वारसा हक्काच्या जागा तत्काळ भरून काढाव्यात. जुनी पेन्शन योजना सुरू करावी. पोलिस कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या कॅशलेस वैद्यकीय सेवांप्रमाने सर्व विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवावी. या आणि अश्या अनेक मागण्यांसाठी आम्ही मुख्यमंत्री यांच्याशी भेट व्हावी म्हणून इतके दिवस प्रयत्न करत होतो, परंतु मुख्यमंत्री आमची भेट घेत नाहीत.असे पठाण म्हणाले.
शासन निर्णय नुसार ३ महिन्यांनी संघटनेचीमीटिंग घेणे गरजेचे असतानाही आम्हाला मीटिंग ला बोलावत नाहीत.आणि म्हणून आम्ही आता आंदोलन करणार आहे असे पठाण यांनी सांगितले.यावेळी भिकू साळुंखे, बाबाराम कदम तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.