मुंबई
काँग्रेस पक्ष (Congress) हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत सर्व समाज घटकाला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न केला जाईल. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) चांगला विजय मिळाला आहे, आता विधानसभा निवडणुकीतही (Assembly Elections) जिल्हा, तालुका, बुथ स्तरावर असेच काम करा आणि राज्यातील महायुतीचे (MahaYuti) भ्रष्ट सरकार हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात मोठा विजय मिळवल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सेल व विभागाच्या वतीने प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सेल व विभागाकडून दादरच्या शिवाजी मंदिर येथे करण्यात आला, यावेळी चेन्नीथला बोलत होते.
नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला यात प्रदेश काँग्रेसच्या विविध सेल व विभागाचे कार्य महत्वाचे ठरले आहे. या सर्वांनी राज्यातील गावागावात जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवण्याचे काम केले. तसेच काँग्रेसच्या ५ न्याय २५ गॅरंटीचे न्यायपत्र घरोघरी पोहचवण्याचे काम केले आहे. लोकसभेची लढाई जिंकलेली असली तरी संघर्ष अजून संपलेला नसून विधानसभा निवडणुकीतही असेच काम करुन विजयी पताका फडकवा,असे आवाहन पटोले यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे सरकार जनतेत नेहमीच फेक नेरेटिव्ह पसरवत असते. महिलांना आरक्षण देण्याचे विधेयक मोठा गाजावाजा करून मंजूर केले पण त्याची अमंलबजावणी ते करू शकत नाहीत कारण जनगणनाच केलेली आहे. मोफत धान्य देण्याच्या नावाखाली प्लास्टिकचा तांदूळ देऊन गोरगरिब जनतेच्या जीवाशी ते खेळत आहेत. कोरोनाकाळात लस दिली व त्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो छापण्यात आला. आता त्या लसीमुळेच लोकांचे मृत्यू होत असल्याचे उघड झाले की भाजपा सरकारने जबाबदारी झटकली. भाजपाचे सरकार फक्त दिखाव्याचे काम करते. जबाबदारी काहीच घेत नाही. राज्यात १ लाख लोकांना नोकऱ्या दिल्या असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हा सुद्धा फेक नेरिटिव्ह पसरवण्याचाच प्रकार आहे असे म्हणत अच्छे दिनचे आश्वासन देऊन भाजपाचे फसवणूक केली पण सत्तेत आलो तर सच्चे दिन नक्कीच आणू, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के. राजू, आणि एस. सी. विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोटिया यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के. राजू, एस.सी. विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोटिया, अल्पसंख्याक विभागाचे राज्याचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन प्रमोद मोरे, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेल व विभागाच्या प्रमुख प्रज्ञा वाघमारे यांनी केले. यावेळी विविध सेल व विभागाच्या प्रमुखांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विभाग व सेलने लोकसभा निवडणुकीत चांगले काम करून विजयात योगदान दिल्याबद्दल प्रज्ञा वाघमारे यांचाही सत्कार करण्यात आला.