मुंबई
मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर (Mumbai) हैराण झाले आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आपल्या दालनात शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे.
आज विधानसभेत आज आमदार अँड आशिष शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खार दांडा, गझदरबांध आणि वांद्रे परिसरातातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारी विधानसभेत मांडल्या. मुंबई महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या उबाठा गटाने मुंबईकरांना 24 तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते प्रत्यक्षात दोन तास ही पाणी मिळत नाही. वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात 24 तास पाणी पुरवठ्याचा पायलट प्रकल्प राबविण्यात आला तो पुर्ण अपयशी ठरला त्यामुळे आता एक तासभर ही पाणी मिळत नाही त्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष आहे. तसेच मुंबईच्या सगळ्याच भागात याबाबत तक्रारी असल्याकडे आमदार अँड आशिष शेलार यांनी लक्ष वेधले. त्याला मुंबईतील अन्य आमदारांनी पाठींबा दिला व मुंबईचे आमदार आक्रमक झाले. त्यामुळे याची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका जल अभियंत्यांनी तातडीने मुंबईतील पाणी पुरवठ्याची माहिती संबधित मंत्र्यांमार्फत सादर करण्याचे निर्देश दिले त्यानंतर मुंबईचे आमदार आक्रमक झाल्याने शुक्रवारी आमदार महापालिका अधिकारी आणि संबंधित मंत्री यांची बैठक विधानभवनात आपल्या दालनात घेण्यात येईल, अशी घोषणा राहुल नार्वेकर यांनी केली.