मुंबई
मुंबईत झालेल्या भीषण अपघातानं (Accident) संपूर्ण शहर हादरलं आहे. मुंबई (Mumbai Accident) उपनगरातील गोरेगाव पूर्व-पश्चिमेला (Goregaon Flyover Accident) जाणाऱ्या उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. उड्डाण पुलावरील संरक्षक कठड्याला धडकून दुचाकी थेट वीस फूट खोल खाली पडल्याने अपघात होऊन यात दोन तरुणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दुचाकीच्या अपघातात वैभव रामदास गमरे आणि आनंद इंगळे अशी या दोघांची नावे आहेत. अपघाताची माहिती मुंबई पोलिसांना समजताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या वैभव आणि आनंद या दोघांनाही पोलिसांनी तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.