मुंबई
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) संपूर्ण राज्याचे लक्ष विधानपरिषदेसाठी होत असलेल्या निवडणुकांवर लागला आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक (Mumbai Teacher) आणि नाशिक विभागीय शिक्षक (Nashik Teacher) मतदारसंघात 26 जून रोजी निवडणूक पार पडली होती तर आज या निवडणुकीचे निकाल (Mlc Election Result) समोर येत आहे. आतापर्यंत चार पैकी तीन मतदारसंघाचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून (Mumbai Graduate Constituency) ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भाजप (BJP) उमेदवार किरण रवींद्र शेलार यांचा तब्बल 44 हजार 784 मतांनी पराभव केला आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं वर्चस्व मुंबईवर दिसून आला आहे.
याबाबत माहिती देताना मुंबई पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पी.वेलरासू म्हणाले की, या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आगरी कोळी संस्कृती भवन येथे एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले त्यापैकी 64 हजार 222 मते वैध तर 3 हजार 422 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 32 हजार 112 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी.वेलरासू यांनी दिली. तर मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर यांनी भाजप उमेदवार शिवनाथ दराडे यांचा पराभव केला.