मुंबई
नागपूर येथील दीक्षाभूमी (Deekshabhoomi) येथे सुरू असलेल्या अंडरग्राऊंड पार्कींच्या कामाला विरोध म्हणून आंदोलन सुरू आहे. काल हे आंदोलन तीव्र झाल्यावर लाठीचार्ज करण्यात आला, भंतेजींच्यावर कारवाई करण्यात आली. हे योग्य झाले नाही. ही परिस्थिती नियंत्रणात आणून त्यावर तोडगा काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी पाहणीसाठी समिती पाठवावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज विधानसभेत केली. त्याचबरोबर इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम होत नाही. चवदार तळ्याचे काम देखील होत नसल्याने वडेट्टीवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, नागपूर दीक्षाभूमीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. त्याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगला आंबेडकरी जनतेचा विरोध आहे. बौद्ध स्तुपाला धोका होऊ शकतो. काल लाठीचार्ज झाला, हा भावना भडकवण्याचा प्रयत्न आहे. काल मी घटनास्थळी भेट दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अध्यक्षांनी पाहणीसाठी समिती पाठवावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, बाबासाहेबांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. इंदू मिल येथील स्मारक, चवदार तळे, दीक्षाभूमी हा श्रद्धेचा विषय आहे. परंतु एक विचित्र मानसिकता असल्याने या ठिकाणची कामे होत नाहीत. चवदार तळ्याच्या कामाला सल्लागार नेमून, तंत्रज्ञानाची मदत सकारने घ्यावी. कालबद्ध कार्यक्रम सरकारने आखावा अशी सूचना करत इंदूमिलच्या कामासाठी एकही रूपया खर्च न केल्याने सरकारवर तीव्र नाराजी वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.