मुंबई
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला (BJP) केवळ 240 जागांवर समाधान मानावे लागले. अयोध्येसह देशातील अनेक मतदारासंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. अशातच आता लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीबाबत भाजपच्या फायर ब्रँड नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharti) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
उमा भारती म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत भाजपला यूपीमध्ये लोकसभेच्या 80 पैकी केवळ 33 जागा मिळाल्या. पक्षाच्या या खराब कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दोष देऊ नये. मोदी आणि योगींनी आपल्या नेतृत्वाने देशातील जनतेला खूप काही दिले आहे. त्यांच्या कार्यचे परिणाम स्पष्ट आहेत, असं त्या म्हणाल्या.
उमा भारती म्हणाल्या की, उत्तर प्रदेशातील निकालांचा अर्थ असा नाही की लोकांची रामभक्ती कमी झाली आहे. पण, प्रत्येक रामभक्त भाजपला मतदान करेल, असं गृहीत धरणं चुकीचं आहे. जो आपल्याला मत देत नाही तो रामभक्त नाही असंही समजण्यचाचं कारण नाही. भाजपला फक्त निष्काळजीपणा भोवला, दुसरं काही नाही, असं त्या म्हणाल्या.
उमा भारती म्हणाल्या की, भाजपला पुन्हा देशात आणि राज्यात मजबूत करण्यासाठी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अधिक एकजूट आणि समर्थपणे काम करणं आवश्यक आहे, असा सल्ला त्यानी दिला. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरीचा मज्जिद पाडल्यांतर भाजपचा पराभव झाला होता. तरीही आम्ही अयोध्येतील राम मंदिर आमच्या अजेंड्यातून हटवले नाही. आम्ही अयोध्येला कधीही मतांशी जोडले नाही. त्याचप्रमाणे आता आम्ही मथुरा-काशी देखील मतांशी जोडत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.