7.6 C
New York

IND vs SA Final : करोडो भारतीयांच्या हृदयाची धडधड वाढवणारा सामना

Published:

विराज विलास चव्हाण

कालचा दिवस सर्व भारतीयांसाठी एक संस्मरणीय दिवस ठरला त्याचे कारण म्हणजे (IND vs SA Final) भारताने सतरा वर्षाने ‘टी 20’ वर्ल्डकप जिंकला आणि आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावली. संपूर्ण स्पर्धेत भारताने अतिशय उत्तम खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि सर्वांचे डोळे अंतिम सामन्याकडे लागले. सात महिन्यांपूर्वी असाच भारताने दिमाखात एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये प्रवेश केला होता आणि भारत हा वर्ल्डकप आरामात जिंकणार असे वाटत असताना आपण ऑस्ट्रेलियाकडून अनपेक्षित हरलो आणि करोडो भारतीयांच्या डोळ्यात अश्रू आले. कर्णधार रोहित शर्मा आणि रनमशिन विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी बघून मी ही त्या रात्री रडलो कारण माझ्यासारख्या नव्वदीच्या दशकातील मुलांनी कळत्या वयातला पहिला वर्ल्डकप २००३ साली पहिला होता त्यावेळी सुद्धा भारत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हरला होता. क्रिकेटच्या प्रेमात पडतच होतो आणि या पराभवामुळे मन दुखावलं होतं. सचिन, गांगुली, द्रविड, सेहवाग, झहीर, श्रीनाथ असे दिग्गज असून सुद्धा आपण हरलो याच वाईट वाटलं होतं. त्यानंतर २००७ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली आपण पहिला ‘टी 20’ वर्ल्डकप जिंकलो आणि त्यामुळे क्रिकेटवरच प्रेम अधिकच वाढत गेलं.

श्रीलंकेला हरवून २०११ चा एकदिवसीय वर्ल्डकप जिंकलो तेव्हा कोकण कृषी विद्यापीठात शिकत असताना हॉस्टेलला केलेला जल्लोष आजही आठवतो आणि त्यानंतर तेरा वर्षांनी पुन्हा तोच जल्लोष करण्याची संधी काल मिळाली. कालचा अंतिम सामना पाहण्यासाठी आम्ही सगळे भावंडं माझा आत्ये भाऊ रोशनच्या घरी जमलो होतो. एकत्र मॅच बघण्याची एक वेगळीच मजा असते. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली हिटमॅन रोहित आणि किंग कोहली ओपनिंगला आले संपूर्ण स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करू न शकणारा विराट काय खेळ दाखवतो याकडे साऱ्यांचे लक्ष होते पहिल्याच ओव्हरमध्ये तीन चौकार मारत आज मी माझा खेळ दाखवणार हे विराटने सांगून टाकले. दुसऱ्या ओवरमध्ये दोन चौकार मारत रोहितने नेहमीप्रमाणे चांगली सुरवात केली ही जोडी चांगली धावसंख्या उभारणार अस वाटत असताना रोहित आऊट झाला आणि काळजात धस्स झालं कारण या स्पर्धेत रोहित चांगला खेळत होता. त्यानंतर त्यांचं ओव्हरमध्ये पंत आणि थोड्याच वेळात सूर्या तंबूत परतले पण अक्षर आणि विराटने चांगला खेळ दाखवत धावसंख्येला आकार दिला. त्यानंतर शिवम दुबे ने छोटीशी पण महत्वपूर्ण खेळी केली. सुरवातीला भारत २०० धावसंख्या सहज गाठेल अस वाटत असताना भारताने साऊथ आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले.

साऊथ आफ्रिका या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली आणि दुसऱ्याच ओव्हरमध्ये बूम बूम बुमराहने हेंड्रीकला आऊट करत भारताला चांगली सुरवात करून दिली. त्यानंतर अर्शदीपने कर्णधार मारक्रमला आऊट करत मोठा अडसर दूर केला. त्यानंतर आलेल्या स्टबने फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली दुसऱ्या बाजूने डी कॉक चांगली फलंदाजी करत होता. या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अक्षरने स्टबला आऊट करत सामना भारताच्या बाजूने वळवला पण त्यानंतर आलेल्या क्लासेनने उत्कृष्ठ खेळ करत सामना आफ्रिकेच्या बाजूने फिरवला डी कॉक आऊट झाल्यावर क्लासेनच्या साथीला मिलर मैदानात आला. ४२ बॉल मध्ये ६८ धावांची आवश्यकता असताना क्लासेनच्या जबरदस्त खेळीने सामना पूर्णपणे आफ्रिकेच्या बाजूने झुकला आणि आफ्रिकेला जिंकण्यासाठी हव्या होत्या २४ बॉल मध्ये २६ धावा…

आता खरी नाट्याला सुरवात होणार होती कारण भारताच्या टीममध्ये अनुभवी कलाकार होते. सर्व भारतीयांच्या हृदयाची धडधड वाढली होती. हा ही वर्ल्डकप हातातून जातो की काय असे प्रश्नचिन्ह उभे होते. कर्णधार रोहित सहकाऱ्यांचे मनोबल वाढवत होता. भारतीय प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होते. सतरावी ओव्हर करण्यासाठी हार्दिक पांड्या बॉलिंगसाठी आला समोर होता तुफानी बॅटिंग करणारा क्लासेन सर्वजण एकटक टी व्ही कडे पाहत होते आणि पहिल्याच बॉलवर पांड्याने क्लासेनची विकेट घेतली आणि एकच जल्लोष झाला. तरीही मॅच अजून भारताच्या हातात आली नव्हती कारण डेव्हिड मिलर नावाचा मोठा अडसर अजून मैदानात होता. अठराव्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा बूम बूम बुमराह भारतासाठी धावून आला त्याने फक्त दोन रन्स देत जॉन्सनची विकेट घेतली आणि भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. आता हव्या होत्या शेवटच्या दोन ओव्हर मध्ये २० धावा. मिलर अजून मैदानात होता कर्णधार रोहित, विराट, बुमराह, पांड्या एकमेकात चर्चा करत होते फिल्डींग मध्ये बदल करत होते “फिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त” असं सांगत होते. एकोणिसावी ओव्हर अर्शदिपने टाकली आणि फक्त चार धावा दिल्या.

शेवटचं षटक ६ चेंडू १६ धावा… समोर मिलर होता आणि बॉलिंगसाठी आला तो हार्दिक पांड्या. कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिकमध्ये पुन्हा एकदा चर्चा झाली अटीतटीची लढाई सुरू होती सर्व भारतीय खेळाडू आपले सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करत होते. सर्व भारतीय प्रार्थना करत होते. सर्वजण डोळ्यात प्राण आणून बघत होते आणि पांड्याने पहिलाच बॉल फुल टॉस टाकला मिलर ने उंच फटका मारला सर्वजण पाहत होते हा षटकार आहे का तेवढ्यात जवळ जवळ सीमारेषेजवळ सूर्यकुमार यादव ने एक अविश्वसनीय झेल घेतला आणि प्रत्येक भारतीयाने आनंदाने उडी मारली कारण मिलर आऊट झाला होता. एक विश्वविक्रमी झेल घेत सूर्यकुमार यादवने सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने वळवला होता. जणू सूर्याने आकाशातून त्या सीमारेषेजवळ भारतासाठी वर्ल्डकपच झेलला होता.

पांड्याने अतिशय अवघड वेळी अतिशय उत्तम कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. सर्व भारतीयांच्या डोळ्यात पाणी होते. कर्णधार रोहित शर्माच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. विराट, हार्दिक यांचेही डोळे आनंदाने वाहू लागले. भारताचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. भारत विश्वविजेता झाला होता. सर्व भारतीय खेळाडू आनंदाने नाचत होते, जल्लोष करत होते. ऐन पावसाळ्यात भारतात दिवाळी साजरी होत होती. कर्णधार रोहित शर्माने वर्ल्डकप उंचवताच सर्व भारतीयांच्या माना अभिमानाने उंचावल्या. या टीमचे हेड कोच द वॉल राहुल द्रविड यांनी ज्याप्रकारे आनंद साजरा केला ते पाहून मन भरून आले. खरच कालचा अंतिम सामना करोडो भारतीयांच्या हृदयाची धडधड वाढवणारा होता आणि दिवस अविस्मरणीय होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img