मुंबई
राज्यात दुष्काळ, अवकाळी, गारपिटीमुळे शेतकरी पिचला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करा, नुकसानग्रस्तांना किती दिवसात भरपाई मिळणार आणि तो कालावधी किती असेल, प्रतिहेक्टरी किती दर असेल असा सवाल करत पहिल्याच प्रश्नांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर घणाघात केला.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात अवकाळी,गारपीठ, दुष्काळात शासन निर्णयाप्रमाणे फक्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळाली नाही. चारा टंचाई, पाणी टंचाईने मराठवाडा होरपळून गेला आहे. सोयाबीनला २०१३ चे दर यावर्षी मिळाले. खतांचे, बियाणांचे दर वाढले आहेत यामुळे राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. ८८ हजार हेक्टरवर पिकांचं नुकसान झाले आहे. अमरावतीत ५४ हजार हेक्टर, अकोला ११ हजार १५७ हेक्टर, यवतमाळ २ हजार ४९४ हेक्टर, बुलढाण्यात ५ हजार ५७७ हेक्टर, वाशीममध्ये ३ हजार ८८८ हेक्टर, खानदेशात नऊ हजार हेक्टर, मराठवाड्यात दोन हजार सातशे सोळा हेक्टर चे प्रस्ताव आले आहेत. या शेतकऱ्यांना निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करावी ही मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांना किती दिवसात नुकसान भरपाई देणार, तो कालावधी किती असेल आणि प्रतिहेक्टरी किती मदत देणार असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित करत सरकारला धारेवर धरले.
राज्यात यावर्षी जानेवारी ते मे महिन्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे २,९१,४३३ हेक्टर जमिनींवरील पिकांचं नुकसान झालं असून राज्य सरकारने यासाठी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला असून त्याचं वितरण येत्या १५ जुलै पर्यंत करण्यात येईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला.