मुंबई
राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon sessions) दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) विधानसभेत मांडला. यावेळी राज्य सरकारकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. महिला, शेतकरी, युवक, बेरोजगारी यांच्यासाठी विविध योजनांची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तसेच सर्वसामान्यांच्या निगडित असलेल्या पेट्रोल, डिझेल संदर्भात देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे.
आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अतिरिक्त आर्थिक बजेट जाहीर केलं आहे. त्यात राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद देण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे. विविध गोष्टींमध्ये सवलतींसह पेट्रोल-डिझेलच्या किंमती देखील कमी करण्यात आल्या आहेत.
पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे वरुन २५ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे ६५ पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे २ रुपये ७ पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे.
2024-25 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा सुधारित कर अंदाज ३,२६,३९७ कोटी आहे. या आर्थिक वर्षाच्या महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दीष्ट ३,४३,०४० कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग केंद्रांना दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल-डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे असं अजित पवार म्हणाले.