मुंबई
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) आता राज्यातील सर्वच पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकी (Assembly Elections) करिता तयारी सुरू केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. महाविकास आघाडीने राज्यात 48 पैकी 30 जागेवर विजय मिळवला आहे तर महायुतीने 17 जागेवर विजया मिळवला आहे. राज्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मोठी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांचे बोलताना केली आहे. आता यामागणीवर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष काय प्रतिक्रिया देता त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी राज्यातील विधानसभा निवडणूक एकत्र लढतील पण त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही. निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं प्लॅनिंग असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र विरोधी सूर आळवला आहे. विधानसभा निवडणुकीत राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल. बिनाचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरही त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलं. यात त्यांनी उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करा अशी अप्रत्यक्ष मागणीही करून टाकली.
संजय राऊत म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल. बिनाचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावाच लागणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्याने उद्धव ठाकरेंचं नेतृत्व पाहिलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार गटात अस्वस्थता वाढली आहे. त्यांच्या नेत्यांकडून मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चेतून निर्णय घेतला जाईल असे उत्तर दिले जात आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मविआने महायुतीला जोरदार झटका देत दमदार कामगिरी केली. काँग्रेस 13 जागा जिंकून राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही स्ट्राईक रेट चांगला राहिला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेही नऊ जागांवर यश मिळवलं. जशी आघाडी लोकसभेत अभेद्य राहिली तशीच विधासनसभेतही राहिल याची काळजी तिन्ही पक्षांकडून घेतली जात आहे.
मध्यंतरी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्याचा पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असे वक्तव्य करुन आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काँग्रेस नेत्यांनी पुन्हा अशी वक्तव्ये करू नयेत याची काळजी घेण्यात आली. राहुल गांधी यांनीही दिल्लीतील बैठकीत मित्र पक्ष नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या अशा सूचना दिल्या होत्या यानंतर काँग्रेस नेत्यांनी सध्या तरी अशी वक्तव्ये टाळल्याचे दिसत आहे.