छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरातील लाडसावंगी येथे बाबासाहेब जनार्धन पडूळ (42) (Babasaheb Padul) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आत्महत्या केली आहे. बाबासाहेब पडूळ हे अल्पभूधारक शेतकरी होते आणि त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी सरकारवर मराठा आरक्षण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. चिठ्ठीत त्यांनी आपल्या मुलाला माफ करण्याचे नमूद केले आहे आणि मनोज जरांगे यांचाही उल्लेख केला आहे.
बाबासाहेब यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत “एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे” असे लिहिले होते. बाबासाहेब यांचे मुलगा ९२ टक्के मिळवूनही त्याच्या इंजिनिअरिंग शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ असल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पडोळे यांनी सांगितले.
घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणण्यात आला आहे. मृताच्या नातेवाईक आणि मराठा बांधवांनी येथे मोठी गर्दी केली असून, न्याय मिळत नसल्यास मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवण्याचा इशारा दिला आहे. महसूल विभागाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी करत, जमावाने तहसीलदार मूनलोड यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे.
बाबासाहेब पडूळ यांनी चिठ्ठीत लिहिले आहे, “मागील आठ महिन्यापासून मराठा आरक्षण हे सरकार देत नाही. माझ्या मुलाला १२ वीमध्ये ९० टक्के मिळाले. त्याचे पुढील शिक्षण कसे करेल. तो इतका हुशार असून मी शिक्षण नाही करू शकत. कारण हे सरकार मराठा आरक्षण देत नाही. मला वावर अर्धा एकर आहे. त्यामध्ये मुलीचे शिक्षण कसे करू?” साहिल हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी या घटनेनंतर जोर धरत आहे.