21 C
New York

Nana Patole : महायुती सरकारने महाराष्ट्र कर्जात डुबवला, काँग्रेसचा हल्लाबोल

Published:

मुंबई

महाभ्रष्टयुती सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर वाढवून ठेवला असून विकासाच्या नावाखाली कर्ज काढून भ्रष्ट मार्गाने मलिदा खाल्ला जात आहे. जागतिक बँकेसह इतर बँकांकडूनही कर्ज काढले आहे, महायुती (Mahayuti) सरकारने राज्यावर 2.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे. एमएमआरडीए (MMRDA) सारखा विभाग नफ्यात होता तोही आता तोट्यात आहे. हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे असतानाही घाट्यात कसा? असा सवाल उपस्थित करत राज्यच लिलावात काढतात की काय? अशी परिस्थिती करून ठेवली आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारवर तोफ डागत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशची तुलना केली तर उत्तर प्रदेश सरकारही असेच कर्ज काढून रस्ते बांधणीचे प्रकल्प करत आहे, उत्तर प्रदेश व महाराष्ट्राच्या रस्ते प्रकल्पाचे अंदाजपत्रक पाहिले तर महाराष्ट्रातील अंदाजपत्रक ४० टक्क्याने वाढीव आहेत. या रस्त्यांच्या कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. अटल सेतुलाही भेगा पडल्या आहेत हे सर्वांनी पाहिले आहे. १८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला भेगा पडतात यावरून त्याच्या कामाचा दर्जा किती निकृष्ठ आहे हे दिसून येते. कर्नाटकातील पूर्वीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते तर महाराष्ट्रातील युती सरकार ६० टक्के कमिशनवाले आहे.

तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी नाना पटोले यांनी आहे. हे अधिवेशन महायुती सरकारचे निरोपाचे अधिवेशन असून जनतेला हिशोब देण्याची वेळ आहे, तो हिशोब द्यावा लागेल. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभागृहात प्रश्न मांडू, सरकारमध्ये हिम्मत असेल तर प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करावी, बहुमताच्या बळावर पळ काढू नये, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, संजय राऊत यांच्या विधानावर भाष्य करणार नाही असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीत काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे पण मोठा भाऊ, छोटा भाऊ अशी कोणतीच भूमिका नसून सर्वांनी एकत्रपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे असेही नाना पटोले यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img